Sun, May 26, 2019 21:35होमपेज › Marathwada › शिवम नावाचा गावाकडचा छोटा संशोधक (Video)

शिवम नावाचा गावाकडचा छोटा संशोधक (Video)

Published On: Feb 23 2018 5:00PM | Last Updated: Feb 23 2018 4:58PMकोल्‍हापूर : महादेव कांबळे/ देविदास पाटील

शिवम जोतिबा पवार, वय 12 वर्षे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर. आपले नाव आणि पत्ता सांगताना मराठवाड्याच्या बोलीचा हेल देत  बोलणाऱ्या शिवममध्ये एक बाल वैज्ञानिक दडला आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर केल्यास लहान वयात मुलांमधील कौशल्य कसे बाहेर येते याचे उदाहरण म्हणून शिवमकडे पाहता येईल. या बाल वैज्ञानिकाने आतापर्यंत पाणबुडी आणि जेसीबी तयार केली आहे.

उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील सिंदफळ येथील सहावीत शिकणारा शिवम घरी असताना इतर मुलांप्रमाणेच आपल्या आई वडिलाचा मोबाईला घेतो. पण तो मोबाईलवर गेम किंवा इतर गोष्टींसाठी वापर न करता ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्‍न करतो. त्याला शाळेतील पुस्‍तकं, विज्ञानाच्या कथा, भूगोलातील नकाशे पाहण्याचा छंद आहे. शिवमची ही आवड बघून मग आईने मोबाईलाचा योग्य वापर करायला शिकवला. गुगल, यूट्यूब, फेसबूकवरील विविध प्रयोगांची माहिती त्याला दिली. मोबाईल म्‍हणजे फक्‍त बोलणे आणि गेम खेळण्याचे साधन नसून शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्‍वाचे साधन कसे आहे हे त्याला आईने समजावले. यातूनच मग शिवमने गुगल, यूट्यूबवर विज्ञानातील विविध प्रयोग शोधत राहिला आणि हे शोधत असतानाच त्‍याला नव्या गोष्टी करण्याची ऊर्जा मिळाली. त्यातूनच त्याने सीरिंजपासून पाणबुडी आणि जेसीबी करण्याची कल्‍पना सुचली.

सध्याच्या पिढीपुढे शिकण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील एक पर्याय म्‍हणजे गुगल. गुगलवर अनेक चांगल्या वाईट गोष्टी  असतात. शिवमने त्यातील उत्तम गोष्टी जाणून घेण्याचा ध्यास घेतला. शिवम गुगल आणि यूट्यूबवर विज्ञानातील नव्या गोष्टी व प्रयोगांची माहिती घेत असतो. त्यातून मग टाकाऊपासून टिकाऊ, विज्ञानाचे प्रयोग त्याला करण्याची उर्मी मिळाली. शाळेचा अभ्यास करून त्‍याची आई त्‍याला मोबाईलवर विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवते. इतकच नव्हे तर त्याच्याकडून करूनदेखील घेते. 

आई, वडील आणि शिक्षक शंकर अभिमान कसबे यांच्या मार्गदर्शनातून शिवम वेगवेगळे प्रयोग करीत असतो. पाणबुडी तयार केल्यानंतर त्याला जेसीबी करण्याची कल्‍पना सूचली. यासाठी त्याने  टाकाऊ साहित्याचा वापर करून जेसीबी तयार केला. त्याने सहा सीरिंज, चार फूटपट्ट्या, प्‍लास्‍टीकचा छोटा डबा, आधारासाठी वहीचा पुट्टा अशी साधने वापरून लहान असलेली जेसीबी तयार केली आहे. शिवमने तयार केलेली जेसीबी लहान असली तरी वास्‍तवात असणार्‍या जेसीबीसारख्याच हालचाल करणारी ती मशीन आहे. जेसीबी छोटी असली तरी ती माती काढण्यासारखे काम, मागे-पुढे जाण्याच्या हालचाली अशा विविध गोष्टी हा जेसीबी करतो. शिवमच्या या कल्पना शक्तीचे त्याच्या घराच्यांना, शिक्षकांना कौतुक आहे. ही आवड जपतना तो केवळ मोबाईलमध्ये अडकून राहत नाही तर शाळेचा अभ्यास करूनच या आवडी जपत असतो. या आवडीसाठी त्‍याला मुख्याध्यापक शहाजी आगलावे, शिक्षक रमेश शेळके, संजय पुजारी, शंकर कसबे, विजय कोळेकर, आनंदकुमार डुरे, भारत जाधवर, सज्जनराव कुरूंद, रवींद्र काशीद, शिवाजी काशीद, औदुंबर गंधले, अण्णा पवार, किरण सुतार, पी. जी. काठेवाड या शिक्षकांनी त्‍याला नेहमीच प्रोत्‍साहन दिले आहे. 

याविषयी त्‍याला विचारल्यावर तो सांगतो, ‘‘मला मोबाईलवर गेम खेळायला नाही आवडत पण विज्ञान आणि भूगोल या विषयातील नव्या गोष्टी पहायला आवडतात. यासाठी माझी आई मला  मोबाईलवर नव्या नव्या गोष्टींची माहिती दाखवत असते’’ 

शिवमला संशोधन म्‍हणजे काय हे नीट सांगता येत नाही. पण  स्वत:च्या कल्पनेतून त्याला अशा गोष्टी करायला आवडतात असे तो सांगतो. मोठे झाल्यावर कोण होणार या प्रश्नावर देखील तो आताचे छोटो प्रयोग मोठ्या स्वरुपात करायचे असल्याचे म्हणतो.