Fri, Apr 26, 2019 04:09होमपेज › Marathwada › तुळजापूरच्या भवानीची महिषासुरमर्दिनी महापूजा

तुळजापूरच्या भवानीची महिषासुरमर्दिनी महापूजा

Published On: Jan 01 2018 5:23PM | Last Updated: Jan 01 2018 6:13PM

बुकमार्क करा
तुळजापूर : देविदास पाटील

तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सवात पौष शु. चतुर्दशी, सोमवार दि. १ जानेवारी रोजी तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. हजारो भाविकांनी देवीचे महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा रुपातील संपूर्ण सृष्टीला त्रस्त करणाऱ्या महिषासुर दैत्याचा वध करतानाच्या रुपाचे दर्शन घेतले. सोमवारी सकाळी महंत तुकोजीबुवा यांनी मंदीर उघडल्यानंतर देवीची चरणतीर्थ पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

त्यानंतर अभिषेकाची घाट झाल्यानंतर तुळजाभवानी देवीच्या पंचामृत अभिषेकपूजेस प्रारंभ झाला. यावेळी महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी विशाल कदम, अतुल मलबा, शिवाजी परमेश्वर, संजय सोंजी, विनोद सोंजी, सचिन परमेश्वर, आदींची उपस्थिती होती. अभिषेक संपन्न झाल्यानंतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला.

पौष शु. चतुर्दशी, रविवार दि. १ रोजी तुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. देवीची या अलंकार महापूजेत असुरराज महिषासुर दैत्याचा वध करतानाची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. यावेळी देवीला प्राचिन, पुरातन पारंपारिक जडजवाहीर दागदागिन्यांनी मढवण्यात आले. अमूल्य रत्न जडवलेले सुवर्ण नेत्र, नाकात मौल्यवान रत्नजडित नथ, भाळावर चंदनगंधांचा लेप असून, त्यावर कुंकुमाचा मळवट भरून त्यावर ॐ कार रेखाटण्यात आला होता. अनमोल किमती हिरे, माणिक, पाचू ,आदी रत्ने जडवलेला सुवर्ण मुकुट, गळ्यात विलोभनीय रत्नहार, पुरातनकालीन सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, विविध मोतीमाळा परिधान केलेले देवीचे महिषासुरमर्दिनीचे विक्राळ उग्ररूप दिसत होते. यावेळी देवीला पिवळसर केशरी रंगातील फिकट हिरव्या काठपदराचा किमती शालू नेसविण्यात आला होता. महिषासुरमर्दिनी अलंकार रुपातील देवी असुरराज महिषासुराच्या त्रासाने भयकंपीत झालेल्या सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या छळाने संत्रस्त झालेल्या स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक भयमुक्त करण्यासाठी महिषासुराशी नऊ दिवस, नऊ रात्री घनघोर तुंबळ युद्ध केले. या नऊ दिवसांच्या प्रचंड युद्धानंतर देवीने महिषासुराचा संहार केला. तिनही लोकांना त्राहीमाम करून सोडलेल्या दैत्यराज महिषासुराचा वध करून देवीने सर्वांना भयमुक्त केले. या तुंबळ युद्धाचा देखावा महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा रुपातून मांडण्यात आला. हजारो भाविक भक्तांनी देवीच्या उग्ररुपातील महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजेचे भक्तीभावाने दर्शन घेतले.