Fri, Jul 19, 2019 07:49होमपेज › Marathwada › केजमध्ये दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

केजमध्ये दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 10:54PMबीड : प्रतिनिधी 

 केज येथील गटसाधन केंद्रातील उत्तरपत्रिका कस्टोडीयन खोलीतील दहावी उर्दू माध्यमाच्या व बारावीच्या मॅथेमॅटिक्सच्या उत्तरपत्रिकास सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत  जळून खाक झाल्या. दरम्यान, या उत्तरपत्रिकास आग कशाने लागली की लावली, याचे गूढ कायम आहे. 

केज तालुक्यातील दहावीच्या व बारावीच्या परीक्षा नऊ केंद्रांवर चालू आहेत. शनिवारी बारावीच्या मॅथेमॅटिक्स विषयाची 1199 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर दहावीच्या तीन परीक्षा केंद्रांवर उर्दू माध्यमाच्या द्वितीय भाषाच्या मराठी विषयाच्या 104 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर व्होकेशनलच्या 52 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर तालुक्यातील नऊ परीक्षा केंद्रांवरील उत्तरपत्रिका केज येथील गटसाधन केंद्रातील कस्टोडीयन गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांच्या कस्टडीत केंद्रप्रमुखांनी दिल्या होत्या. या उत्तरपत्रिकांना सील करून त्या कस्टोडीयन खोलीतील सतरंजीवर ठेवण्यात आल्या होत्या.

सायंकाळी साडेपाच वाजता या खोलीस कस्टोडीयन तथा गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे हे कुलूप लावून कळंब येथे निघून गेल्यानंतर सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास उत्तरपत्रिका ठेवलेल्या  खोलीतून धूर येत असल्याचे शिपाई अमोल चवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना दिल्यानंतर तब्बल दोन तासांनी ते घटनास्थळी आले. तेव्हा संपूर्ण उत्तरपत्रिका आगीत जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, कस्टोडीयन खोलीतील उत्तरपत्रिकास आग कशामुळे लागली. याबाबत गूढ असून आग लागली की लावली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या बाबतीत शिक्षणाधिकारी व बोर्डास माहिती देण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांनी सांगितले. 

चाव्या शिक्षकाकडे
कस्टोडीयन खोलीच्या चाव्या कस्टोडीयन ऐवजी शिक्षकाकडे ठेवण्यात आल्या होत्या. गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकास आग कशामुळे लागली, याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू
आहे. या आगीबाबतीत गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

परीक्षा परत होणार का?
दहावी व बारावीच्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी रात्रीचा दिवस करत अभ्यास करून परीक्षा दिली, त्यांनी परीक्षा दिलेल्या उत्तरपत्रिका आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाल्याने परीक्षार्थींना आता उत्तरपत्रिका जळालेल्या विषयाची परीक्षा परत द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षा घेणार की गुणांकन करणार, याची चर्चा सुरू आहे. 

विद्युतपुरवठा खंडित
विद्युत देयक न भरल्याने गटसाधन केंद्राचा विद्युतपुरवठा गेल्या काही महिन्यांपूर्वी खंडित करण्यात आलेला आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे आगीचे कारण गुलदस्त्यात आहे.