Wed, Feb 20, 2019 02:31होमपेज › Marathwada › टंचाई आराखडा मंजुरीसाठी प्रतीक्षेत

टंचाई आराखडा मंजुरीसाठी प्रतीक्षेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : प्रतिनिधी

जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे; पण तो मंजुरीसाठी अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला नसल्याचा उलगडा जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात 26 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या बैठकीत झाला. याप्रकरणी उपस्थित सदस्यांनी तब्बल दोन तास प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. 

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मुबलक प्रमाणात कसे पाणी मिळेल, याचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तालुका पातळीवर याबाबत बैठका घेऊन त्याचे नियोजन केले आहे. हा तयार केलेला आराखडा जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठवला जातो; पण अजूनही हा आराखडा तिकडे पाठवला गेला नसल्याचा उलगडा या बैठकीत झाला. यामुळे बैठकीतील सदस्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. 

आजच्या स्थितीला ग्रामीण भागातील अनेक गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याकडे मात्र जिल्हा परिषद प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदस्यांनी वारंवार याबाबत कल्पना देऊनही आराखडा करण्याचेच काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. 

त्यातून तयार झालेला आराखडा अजून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला नाही. यामुळे हा आराखडा केव्हा पाठवला जाईल, असा सवालही उपस्थित सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरत विचारला. बैठकीस सभापती अशोक काकडे, सभापती सूर्यवंशी, आणेराव, बाळासाहेब रेंगे, घुगे, राऊत, टेंगसे, रोकडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील उपअभियंंता यांची उपस्थिती होती. 

Tags : Parbhani news, scarcity plan waiting for approval


  •