Tue, Jul 16, 2019 09:44होमपेज › Marathwada › सामूहिक विवाह सोहळ्यातून लाखोंची बचत

सामूहिक विवाह सोहळ्यातून लाखोंची बचत

Published On: Mar 13 2018 10:03PM | Last Updated: Mar 13 2018 10:03PMपरभणी : प्रदीप कांबळे

विवाहासाठी लाखो रुपये खर्च केल्याशिवाय विवाह पार पडत नसल्याने गोर-गरीब कुटुंबातील पालकांना पाल्यांच्या विवाहासाठी मोठ्या-तडजोडी करून विवाह पार पाडावा लागतो. प्रसंगी अनेक कुटुंबाची आर्थिक स्थितीही डबघाईला येते. यामुळे समाजात सामूहिक विवाह सोहळा चळवळ वृध्दिंगत व्हावी यासाठी शासनाने विवाह सोहळा आयोजनासाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केली. जिल्ह्यातील  तीन स्वयंसेवी संस्थांनी उत्कृष्टपणे आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यातून दरवर्षी लाखो रुपयांची बचत होत आहे.

विवाहाच्या स्वरूपात  आमूलाग्र बदल झाले आहेत.  कायद्याने हुंडाबंदी असली तरीदेखील हुंडा देणे-घेणे हे समाजात सुरूच आहे. पाल्याच्या विवाहासाठी विशेष तरतूद करणारी पध्दत रूढ झाली आहे. शिक्षण व अर्थकारणाचा विवाहावर विपरित परिणाम झाला आहे. विशेषतः मुलींच्या पालकांची दयनिय अवस्था समाजात पाहयला मिळत आहे. कर्ज काढून विवाह सोहळा पार पाडणार्‍या पालकांवर मुलींच्या लग्‍नात कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे. यामुळे शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत.परभणीतील राजे संभाजी मित्र मंडळ, संबोधी अकादमी व पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्था चांगल्या प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करतात.  

जिल्ह्यात सामूहिक विवाह चळवळ वृध्दिंगत झाली असून दिवसेंदिवस सामूहिक सोहळ्यात विवाह करणार्‍यांची संख्या वाढत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या कन्यादान योजनेत नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य करण्यात येते. सामूहिक विवाह आयोजनासाठी या योजनेंंतर्गत स्वयंसेवी संस्थेला प्रतिजोडपे 4 हजार रुपये दिले जातात. यात त्यांच्याकडून विवाह सोहळ्यात भोजनासह अन्य व्यवस्था केल्या जाते. 

मुलीच्या वडिलांना प्रोत्साहनपर 20 हजार रुपये तर नववधूला मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूदेखील देण्यात येतात. सन 2016-17 मध्ये अनुसूचित जातीच्या सामूहिक सोहळ्याचे आयोजन करून संबोधी अकादमीने 50 जोडप्यांचा विवाह लावला होता. त्यात त्यांना 14 लाख 40 हजार रुपयांचा खर्च समाजकल्याण विभागाने त्वरित केला. भटक्या विमुक्‍त जातीच्या एका जोडप्यासाठी 24 हजार रुपये खर्च केला.पीपल्स एज्युकेशन सोसायटीने 15 जोडप्यांचे विवाह लावले, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्‍त तेजस माळवदकर यांनी दिली. 

सामूहिक विवाह चळवळीची यशस्वी वाटचाल ः जिल्ह्यात सामूहिक विवाह चळवळीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संबोधी अकादमी, राजे संभाजी मित्रमंडळ यासारख्या संस्था चांगले विवाह सोहळे आयोजित करून शेकडो  जोडप्यांचे कन्यादान करतात. यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबीयांतील पाल्यांचे विवाह बचतपूर्ण स्थितीत होण्यास मदत होते. शिवाय कुटुंबाची आर्थिक संकटातून सुटकाही होते. मुला-मुलींच्या विवाहाचे ओझे कमी होऊन विवाह सहजरीत्या पार पडतात. यासाठी जास्तीत जास्त जोडप्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केल्यास शासनाचे अर्थसहाय्य मिळतेच पण वैयक्‍तिक बचतही होते.

राजे संभाजी मित्रमंडळ, शिवसेनेचा उपक्रमही समाजोपयोगी

राजे संभाजी मित्रमंडळामार्फत खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. यातून दरवर्षी शेकडो सर्वधर्मीय जोडप्यांचे विवाह लावून त्यांना संसारोपयोगी साहित्य व लग्‍न समारंभप्रसंगी लागणार्‍या वस्तू दिल्या जातात. येणार्‍या पाहुण्यांची परिपूर्ण व्यवस्था करुन सामूहिक विवाह सोहळा करण्याची परंपरा राजे संभाजी मित्रमंडळ चालवत आहे. शिवसेनेतर्फे ही खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा 29 फेब्रुवारी 2016 रोजी आयोजित करून 333 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत.  त्यामुळेच सामूहिक विवाह चळवळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृध्दिंगत झाली आहे.  

यामुळे दुष्काळजन्य स्थितीत अनेक जोडप्यांचे विवाह एकत्रित पार पडतात. यातून वैयक्‍तिक होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचत असल्याची भावना सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह पार पडलेल्या जोडप्यांकडून व्यक्‍त होत आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या सामूहिक सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांनी विवाह केल्यास विवाहावर होणारा अनावश्यक खर्च कमी होऊन आर्थिक अडचणीही कमी होतील.  
-तेजस माळवदकर, समाजकल्याण सहायक आयुक्‍त