Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Marathwada › सौदीने व्हॅट लावला; हज यात्रा महागणार

सौदीने व्हॅट लावला; हज यात्रा महागणार

Published On: Mar 25 2018 10:52AM | Last Updated: Mar 25 2018 10:52AMलातूर : प्रतिनिधी

सौदी अरेबिया सरकारने प्रथमच हज यात्रेकरुंच्या आर्थिक व्यवहारावर पाच टक्के व्हॅट लावला आहे. त्यामुळे तेथील सेवा घेताना यात्रेकरुंवर आर्थिक भार पडणार आहे. तथापि, तो कमीत कमी पडावा, यासाठी हज कमिटीने विशेष लक्ष पुरवल्याची व उपाययोजनाही केल्याची माहिती हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मसूद अहमद खान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. खान म्हणाले, हज यात्रेकरुंना देण्यात येणारे सरकारी अनुदान बंद करण्यात आले असले तरी छोट्या विमानतळाऐवजी महानगरातील विमानतळांवरुन ही यात्रा केल्यास खर्चात मोठी बचत होणार आहे. त्यामुळे कमिटीने यात्रेकरुंना मोठ्या विमानतळावरुन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. त्यास चांगला प्रतिसादही मिळाला आहे. सरकारने हज यात्रेकरुंच्या कोट्यात वाढ केली असून यावर्षी पाच हजार अधिक यात्रेकरुंना ही यात्रा करता येणार आहे. यावर्षी १ लाख ७५ हजार लोक यात्रेस जातील. सौदी अरेबियात भारतीयांना दर्जेदार व अद्यावत सेवा मिळाव्यात, त्यांना अंतर्गत परिक्रमाही करायला मिळावी म्हणून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे प्रयत्नशील आहेत.

भारतीयांना कमीत कमी  वेळात अधिकाधिक पवित्र स्थळांना भेटी देण्यासाठी १०० टक्के मेट्रो ट्रेनने प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी यासाठी भारत सरकारने सौदी अरेबियाकडे केलेली मागणी मान्य होण्याच्या मार्गावर असल्याचे खान यांनी सांगितले. कोणत्याही संस्थेला हज कमिटीने आर्थिक व्यवहाराची परवानगी दिली नाही. त्यामुळे हज यात्रेसाठीचे पैसे यात्रेकरुंनी सरळ हज यात्रा कमिटीच्या खात्यावर ऑनलाईनने भरावेत. याउपर कोणी फसवणूक केल्याचे आढळल्यास त्याच्याविरुध्द पोलिसांत तक्रार दाखल करावी. योग्य पुरावे देऊन अशी तक्रार हज कमिटीकडेही दाखल करता येऊ शकते, असेही खान यांनी सांगितले.

हजला प्रथमच जाणार तेराशे महिला

यावर्षी देशातून प्रथमच ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या १३०० महिला चार-चारच्या समूहाने हज यात्रा करणार आहेत. त्यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष पुरविण्यात आले असून त्यांच्या सेवेसाठी  कादिमा नियुक्त रण्यात येणार आहेत.

Tags : saudi arabia, haj travels, VAT, muslim, islam