होमपेज › Marathwada › हिंगोली : महिला सरपंचाचा पतीला लाच घेतांना रंगेहाथ पकडले

हिंगोली : महिला सरपंचाचा पतीला लाच घेतांना रंगेहाथ पकडले

Published On: Dec 05 2017 6:20PM | Last Updated: Dec 05 2017 6:20PM

बुकमार्क करा

हिंगोली : प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यातील संघानाईक तांडा येथील महिला सरपंचाचे पती प्रेमदास राठोड यास विहिरीच्या कामासंदर्भात तीन हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीच्या पथकाने औंढा नागनाथ येथे मंगळवारी दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास केली.

तालुक्यातील संघानाईक तांडा येथील महिला सरपंचाचे पती प्रेमदास राठोड यांनी काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांचा भाऊ सुरेश राठोड यास विहिरी संदर्भात चार हजार रूपयांची लाच मागितली होती. यामध्ये विहिरीचा ग्रामंपचायतमध्ये ठराव घेतल्याचा तसेच त्याच्या ओळखीने पंचायत समितीमधून रोजगार हमी योजनेतून विहिर मंजूर करून आणल्याचा मोबदला म्हणून आणि विहिरीचे खोदकाम सुरू करण्यासाठीची परवानगी देण्याचे पत्र देण्यासाठी तसेच ई-मस्टर प्रमाणे मजूर पुरविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या बाबत तक्रारदारांनी हिंगोली येथील एसीबी कार्यालयात रितसर तक्रार केली होती.

 सदर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी औंढा नागनाथ येथील हरिहर मंदिरा समोरील रस्त्यावर एसीबीने सापळा रचला. मंगळवारी दि.5 डिसेंबर रोजी दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून तीन हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीच्या पथकाने केली. सदर कारवाई पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.