Wed, Sep 19, 2018 12:50



होमपेज › Marathwada › सारंगी महाजनांच्या आरोपाने वादाला नवे वळण

सारंगी महाजनांच्या आरोपाने वादाला नवे वळण

Published On: Dec 03 2017 11:48AM | Last Updated: Dec 03 2017 11:47AM

बुकमार्क करा





उस्मानाबाद : प्रतिनिधी

महाजन कुटुंबियाचे मूळ गाव असलेल्या उस्मानाबादेत जमिनीच्या वाटणीवरुन सध्या नव्याने वाद पेटला आहे. त्यातच सारंगी यांनी पती प्रवीण महाजनांच्या मृत्यूवरुन थेट आरोप केल्याने वादाला नवे वळण मिळाले आहे.

उस्मानाबाद शहरातील बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या २९ गुंठे जमिनीवरुन हा वाद सुरु आहे. ही जमीन तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टला प्रमोद महाजनांनी दान दिली होती. त्यानंतर तिथे त्यांचे वडील व्यंकटेश महाजन नावाने महाविद्यालय उभारले. सुरुवातील प्रकाश महाजन यांनी या जमिनीतील हिस्सा मागितला होता. पुढे हा वाद अनेक वर्षे कायम होता. कालांतराने प्रवीण महाजन यांच्या मृत्यूनंतर सारंगी महाजन यांनी या हिश्श्यात मागणी केली आहे. गेल्या सात वर्षांपासून ही केस सुरु असल्याचे सारंगी यांनी सांगितले. काल उस्मानाबादेत आल्यानंतर सारंगी यांनी खासदार पूनम महाजन यांच्या ‘पीए’च्या गुंडांमार्फत धमक्या येत असल्याचा आरोप केला. महाजन कुटुंबिय जमिनीत वाटा देत देण्यास तयार नसले तरी माझा हक्‍क मी मिळवणारच असेही त्या ठामपणे सांगत आहेत. दरम्यान, कारागृहात बीपी तसेच डायबेटिसच्या गोळ्या बंद केल्यानेच पॅरोल असताना प्रवीण यांचा मृत्यू झाल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. गोळ्या बंद करणारे आज हयात नसल्याने त्यांचे नाव घेऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोप घाणेरडे : प्रकाश महाजन

दरम्यान, प्रकाश महाजन यांनी सारंगींचे आरोप घाणेरडे व धादांत खोटे असल्याचे सांगितले. तिला जमिनीचा वाटा देण्यास कोणाचाही विरोध नाही. केवळ ती सहानुभूती मिळविण्यासाठी खोटेनाटे आरोप करीत असल्याची संतप्‍त प्रतिक्रिया दिली.