Mon, Aug 19, 2019 10:03होमपेज › Marathwada › #Women’sDay कर्तृत्ववान कारभारणींच्या हाती पाटोदा तालुक्याची दोरी 

#Women’sDay कर्तृत्ववान कारभारणींच्या हाती पाटोदा तालुक्याची दोरी 

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMपाटोदा : महेश बेदरे 

पाटोदा तालुक्यात राजकारण, अध्यात्म, पोलिस व प्रशासनात महिलांनी अद्वितीय असे कर्तृत्व सिद्ध करून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. विशेष बाब म्हणजे पाटोद्याच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा या महिलाच आहेत. या ठिकाणी नगर पंचायत मुख्याधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती सभापती, उपसभापती, यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक देखील महिलाच आहे. अध्यात्मातून समाजप्रबोधनाचे कार्य करून स्त्रीभृण हत्येविषयी समाजात जनजागृती करणार्‍या देखील महिलाच आहेत.

पहिल्या नगराध्यक्षाचा मान मनीषा पोटे यांना पाटोदा नगरपंचायत अस्तित्वात येऊन आता दोन वर्ष होत आहे. या नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून मनीषा बळीराम पोटे यांनी  कर्तृत्व सिद्ध केले आहे. नगरपंचायतच्या माध्यमातून त्यांनी पाटोदा शहराच्या विकासाठी अनेक महत्वाची कामे केली आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे शहरात स्वच्छता अभियान हे अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. शहरातीत प्रत्येक ठिकाणी पथदिवे, रस्ते, या सुविधांसोबतच घंटागाडी, कचरा कुंड्या बसविल्या आहेत. या बरोबरच वृक्ष लागवडी सारखे उपक्रम देखील राबविले आहेत. नगरपंचायत व नगराध्यक्षांच्या या कार्याच राज्यस्तरीय समितीने कौतुक केले.

महिला व बालकल्याणाचा सक्षम कारभार
पाटोदा नगरपंचायतमध्ये नुकताच महिला व बालकल्याण विभागाचा पदभार अनिता श्रीहरी गिते यांनी स्वीकारला. अत्यंत सक्षमपणे तो त्या सांभाळीत आहेत. त्यांच्या प्रभागातील गांधनवाडी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाणी व पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून केलेले ‘शोले स्टाईल’आंदोलन गाजले होते.

धडाकेबाज : पोलिस उपनिरीक्षक वैशाली पेटकर
पाटोदा पोलिस ठाण्यात नुकत्याच आलेल्या पोलिस उपनिरीक्षक वैशाली पेटकर यांनी त्यांच्या धडाकेबाज कामगिरीने स्वतंत्र ओळख तयार केली. त्यांचे मूळ गाव जामखेड तालुक्यातील असून त्यांचे शिक्षण जामखेड महाविद्यालयात झालेले आहे. 2015 ला त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिक ग्रामीण ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी दामिनी पथकाच्या माध्यमातून रोडरोमिओंना अक्षरशः सुतासारखे सरळ करून जबरदस्त दरारा तयार केला होता. आता त्या पाटोदा पोलिस ठाण्यात रुजू झाल्या आहेत. मुलींना छेडछाड करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याने त्यांनी सांगितले. 

पाटोद्याला मुख्याधिकारीही महिलाच
पाटोदा शहराच्या प्रथम नगराध्यक्षा ज्या प्रमाणे महिला आहेत त्याच प्रमाणे नगर पंचायतच्या पहिल्या मुख्याधिकारीही महिलाच असण्याचा योगायोग या ठिकाणी आहे. नीलम कांबळे या मुख्याधिकारी सध्या पाटोदा नगर पंचायतची प्रशासकीय बाजू सांभाळीत आहेत, अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नगराध्यक्षा देखील महिलाच असल्यामुळे अत्यंत समन्वयाने त्या नगर पंचायतचे कामकाज  चालवत आहेत.