Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › धोंडराई शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

धोंडराई शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

Published On: Feb 13 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 2:52AMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील धोंडराई येथील कचरू साखरे यांच्या शेतातील निवासस्थानी रविवारी रात्री सहा ते आठ दरोडेखोर आले होते. त्यांनी साखरे कुटुंबीयांना बेदम मारहार करत नगदी 28 हजारांसह सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तिघांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किसनराव साखरे (वय 65) यांचे गावापासून अर्ध्या ते एक किलोमीटर अंतरावर शेत आहे. ते शेतातील घरातच आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. दोन दिवसांपूर्वीच कचरू साखरे यांनी शेतातील सोयाबीन विकले होते, त्याचे 28 हजार रुपये आले होते. दरम्यान रविवारी रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास लाठ्या-काठ्या आणि टॉमी घेऊन सहा ते आठ दरोडेखोरांनी साखरे यांच्या शेतातील घरावर हल्ला चढवला. कचरू साखरे  झोपेतच असताना टॉमीने मारा केल्याने त्यांची शुद्ध हरपली. त्यांना त्याच स्थितीत दरोडेखोरांनी ओढत एका खोलीत नेऊन डांबले. या दरोडेखोरांनी केसरबाई कचरू साखरे (वय 60) यांना मारहाण केली. त्यांचा 20 वर्षीय नातू बाजीराव दुधसागर यालाही बेदम मारहाण केली. दरोडेखोरांनी नगदी 28 हजार रुपयांसह केसरबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. जखमींना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी रुग्णालयात साखरे कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेचा वृत्तांत समजून घेतला. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सरपंचाच्या घरात राक्षसभुवन येथे चोरी
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येेथील माजी सरपंचाच्या घरी रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल घरातील पन्नास हजार व सात तोळे दागिने चोरून नेले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून ते चोरटे पसार झाले. 

माजी सरपंच प्रदीप काळम व त्यांचे कुटुंबिय घरामध्ये रविवारी झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या मागच्या खिडकीतून आत प्रवेश केला. पन्नास हजार रुपये व सात तोळे दागिने मोठ्या शिताफि ने नेले. प्रदीप काळम हे पहाटे लघुशंकेसाठी बाहेर जात असताना त्यांना घराचा दरवाजा बाहेरून लावल्याचे लक्षात आले. त्यांनी बाहेरच्या खोलीत झोपलेल्या गड्यास आवाज देऊन जागे केले. कडी उघडल्यानंतर त्यांनी घराची पहाणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आहे. माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि शिवाजी गुरमे करीत आहेत.