Tue, Apr 23, 2019 22:06होमपेज › Marathwada › उरुसाच्या उत्साहावर बदलत्या जीवनपध्दतीचा परिणाम

उरुसाच्या उत्साहावर बदलत्या जीवनपध्दतीचा परिणाम

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 07 2018 9:56PMपरभणी : प्रदीप कांबळे

हजरत शहा तुराबुल हक्‍क रहे यांच्या उरुसाचा उत्साह सातव्या दिवशीही कायम असला तरी ठराविक वेळेतच गर्दी होताना दिसत आहे. उर्सावर बदलत्या आधुनिक जीवनपध्दतीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान अनुचित प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन करीत पोलिसांचा चोख बंदोबस्त  ठिकठिकाणी तैनात ठेवला आहे. परंतु स्वच्छता व आरोग्य विभागाने मात्र उरुसाकडे पाठच फिरवली असल्याची खंत यात्रेकरूंमधून व्यक्‍त करण्यात येत आहे. 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उर्साला  मोठ्या उत्साहात 31 फेब्रुवारीला सुरुवात झाली. मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातुन लोक उरसासाठी परभणीत येऊन दाखल झाले आहेत.  विविध प्रकारच्या वस्तूंनी दुकाने थाटली आहेत. परंतु ठराविक वेळेलाच लोकांची गर्दी होत असल्याने व्यापार्‍यांची एकच धांदल उडत आहे. साधारणतः उर्सात येण्यासाठी विशिष्ट वेळेचे नियोजन करणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. पुर्वी उरुस सुरु झाला की, भाविक नियमितपणे प्रतिसाद देत असत. परंतु अलीकडील काळात उरुसाच्या व्यावसायिक उलाढालीत बदल झाला आहे.   यामुळे उर्सातील उत्साह हा केवळ औपचारिकता असल्याचेही जाणवत आहे.

तुराबुल हक्‍क यांच्या श्रध्देने प्रभावित असलेले भाविक वर्षानुवर्षे उरुसाला येत असत व मुनमुरादपणे असलेल्या साधन सामग्रीचा आनंद घेत असत. परंतु यावर्षीच्या  उर्सात केवळ लहान मुले व महिलांशी निगडीत वस्तूच अधिक प्रमाणात विक्रीसाठी असल्याने पुरुषमंडळी केवळ बघ्याची भुमिका निभावत आहेत. यामुळेच उरुसाच्या निश्‍चीत वेळेतच गर्दी होण्याचे हेही कारण ठरले आहे. कारण नोकरी, व्यवसाय व इतर कामधंदा आटोपून संध्याकाळी उर्सात येणार्‍यांची संख्या अधिक आहे. शिवाय खेड्या-पाड्याच्या लोकांनी उर्साकडे काही प्रमाणात पाठ फिरवली असून पुर्वी शहरातील रस्त्या-रस्त्याने उर्सातील वस्तू घेवून बसस्थानक-रेल्वेस्थानक परिसरात येणार्‍या लोकांचे जत्थे दिसेनासे झाले आहेत. यामुळे उरुसावर बदलत्या जीवनपध्दतीचा परिणाम पडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरीही गोरगरीब, कष्टकरी मंडळी उर्सात मोठ्या संख्येने येताना दिसत आहे.