होमपेज › Marathwada › बंदोबस्तात काढली अतिक्रमणे

बंदोबस्तात काढली अतिक्रमणे

Published On: Feb 09 2018 2:16AM | Last Updated: Feb 09 2018 2:15AMबीड : प्रतिनिधी

येथील नगर पालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख भागात गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस लहान दुकानदारांचा विरोध अपेक्षित धरून तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणे काढण्यात आल्याने रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला. 

अतिक्रमणधारकांना पालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्या, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमणधारक स्वत:हून अतिक्रमणे काढत नसल्याने पालिकेने गुरुवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम होती घेतली. साठे चौकापासून मोहिमेला सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात रस्त्यांवर लागलेल्या हातगाड्यांसह छोट्या मोठ्या टपर्‍यांवर हातोडा फिरवण्यात आला. नगर परिषद मार्गे भाजीमंडईत मोहीम पोहोचली. त्या ठिकाणी काही वेळ भिंत पाडण्यावरून तणाव निर्माण झाला होता. पालिकेने नियमानुसार भाजीमंडईतील सर्व अतिक्रमणे काढली. अतिक्रमणे काढताना मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान, विद्युतचे अभियंता मुंडे, ट्रेसर सय्यद लईक, स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके, भागवत जाधव, आर. एस. जोगदंड, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका यांच्यासह शेकडो पालिका, पोलिस कर्मचार्‍यांसह आरसीपीचे जवान बंदोबस्तावर होते. 

पुजार्‍याने केेला विरोध :   बशीरगंज चौकातील अतिक्रमित भिंत पाडताना एका पुजार्‍याने अडथळा आणला. त्याने स्वत:च्या डोक्यात दगड मारून घेत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.  डॉ. जावळीकर, उपअधीक्षक खिरडकर, सुलेमान यांनी प्रकरण गांभिर्‍याने हाताळले. पुजार्‍याला पोलिस रुग्णालयात दाखल करून मोहीम पुढे सरकली.