Fri, Jul 19, 2019 01:40होमपेज › Marathwada › ‘विश्‍वासघातकी सरकारच्या विरोधात हल्‍लाबोल यात्रा!’

‘विश्‍वासघातकी सरकारच्या विरोधात हल्‍लाबोल यात्रा!’

Published On: Jan 14 2018 7:14PM | Last Updated: Jan 14 2018 7:14PM

बुकमार्क करा
उस्मानाबाद : प्रतिनिधी

खोट्या आश्‍वासनांचे जाळे टाकून जनतेचा आणि शेतकर्‍यांचा विश्‍वासघात करणार्‍या सरकारला भानावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात हल्‍लाबोल यात्रेचे नियोजन करणार आहे. मराठवाड्यातील ही यात्रा कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशिर्वाद घेऊन सुरु होणार आहे. अशी माहिती माजी महसूल राज्यमंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी भवनात आज ही पत्रकार परिषद झाली. आ. पाटील म्हणाले, 12 ऑक्टोबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी तुळजापुरात प्रचारासाठी आले होते. त्यांनी त्या वेळी तुळजापूरचे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्ष झाले तरी हे आश्‍वासन हवेतच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जून 2015 मध्ये जिल्ह्यातील दुष्काळ पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यासाठी 550 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. या अडीच-तीन वर्षांत यातील केवळ 23 कोटी रुपयेच आले आहेत. कृष्णा खोर्‍याचे पाणी उस्मानाबादला आणण्यासाठी 4600 कोटींचा खर्च आहे. प्रत्यक्षात आत्तापर्यंत सरकारने केवळ 200 कोटी दिले आहेत. उस्मानाबादेतील कौडगाव एमआयडीसी अर्धवट अवस्थेत आहे. उद्योग आणण्यास पालकमंत्री दिवाकर रावते कमी पडत आहेत. सौरऊर्जा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया ठप्प आहे, असे अनेक विषय आहेत. या शिवाय शेतकर्‍यांना हमीभाव; धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाला आरक्षण, सोयाबीन, तूर, कापूस खरेदी केंद्रांची वाताहत असे अनेक प्रश्‍न ऐरणीवर आहेत. त्यावरही हे सरकार निर्णय घेत नसल्याने हे आंदोलन केले जात आहे. मंगळवारी दि. 16 रोजी तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेऊन यात्रा सुरु होईल. दुपारी एकला उस्मानाबादेत सभा होईल. रात्री उमरग्यात मुक्‍काम आहे.’’