Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Marathwada › कर्जमाफीत शेतकर्‍यांची फसवणूक : राजू शेट्टी 

कर्जमाफीत शेतकर्‍यांची फसवणूक : राजू शेट्टी 

Published On: Feb 14 2018 9:16PM | Last Updated: Feb 14 2018 9:16PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याची घोषणा करणार्‍या भाजप सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली आहे. बँकांकडून कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांच्या याद्या मागवूनही अद्याप मेळ लागलेला नाही. हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतरही खरेदीच न झाल्याने व्यापार्‍यांना कवडीमोल दराने शेतीमाल विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यातील शेतकर्‍यांचे 6 लाख 50 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश वालवडकर, गोरख भोरे, महिला आघाडीच्या रसिका ढगे, पूजा मोरे, माणिक कदम, विश्वास चव्हाण, जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर निष्क्रीयतेचा आरोप करीत शेतकर्‍यांची क्रूरथट्टा केल्याचा आरोप केला. कर्जमाफी प्रक्रियेत ऑनलाइनचा घोळ अद्याप कायम असल्याचे सांगून 23 हजार कोटी दिले असल्याचा सरकारचा दावा फोल असल्याचा आरोपही त्यांनी केला. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांनीही भाजप सरकारमध्ये आपण सहभागी होऊनही केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी बाहेर पडलो. मात्र, आजही शेतकर्‍यांच्या हितासाठीच आपला लढा सुरू असल्याचे सांगितले. मेळाव्यात उपस्थित पदाधिकार्‍यांचीही भाषणे झाली.