Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Marathwada › नुकसान भरपाईच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या डोळ्यांत धूळफेक

नुकसान भरपाईच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या डोळ्यांत धूळफेक

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:05AMबीड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना शेती कसण्यासाठी एकरी 15 हजार रुपयांवर खर्च येतो, मात्र सरकार साडेचार हजारांचे अनुदान जाहीर करून शेतकर्‍यांच्या डोळयांत धूळफेक करीत आहे. सरकारने गारपीट, बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार अनुदान दिले नाही, तर मंत्र्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला बीड तालुक्यातील सौदाणा येथे आयोजित आक्रोश परिषदेत ते बोलत होते. 

बोंडअळी, गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची सरकारने योग्य ती दखल घ्यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सौदाणा येथे आक्रोश परिषद आयोजित केली होती.  जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, पं.स. सदस्या पूजा मोरे, सोमनाथ बोराडे, राजाभाऊ देशमुख, गजानन पाटील घंगाळे, श्रीनिवास भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती.  खासदार राजू शेट्टी म्हणाले, की  बोंडअळी, गारपीट यामुळे शेतकरी खचला आहे. सरकार मात्र  तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकर्‍यांची धूळफेक करीत आहेत. सरकारने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली.  यापुढे मंत्र्यांना गावोगाव फिरू देणार नाही, संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी मंत्र्यांच्या गाड्या फोडतील असा इशाराही  खा. शेट्टी यांनी दिला.

  कुलदीप करपे यांनी शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याचे सांगून  मदत करण्याची मागणी केली. पूजा मोरे यांनी शेतकर्‍यांना मदत न केल्यास मंत्र्यांना साडीचोळी भेट देणार असल्याचा सांगितले.  राजू गायके, गोपीनाथ फड, राजेंद्र डाके पाटील, अनिल पवार, जालिंदर पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.