Sun, May 26, 2019 13:29होमपेज › Marathwada › पुंडी-वाहिरा येथे वादळाने नुकसान

पुंडी-वाहिरा येथे वादळाने नुकसान

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:29PMआष्टी : प्रतिनिधी

तालुक्यात वादळी वार्‍यासह झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने प्रचंड नुकसानीला बळीराजाला सामोरे जावे लागले आहे. चक्रीवादळासह झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील पुंडी, वाहिरा, धानोरा, कडा व परिसरातील असणार्‍या शेतकर्‍यांच्या फळबागांचे नुकसान झाले. यामध्ये एकनाथ बबन थोरवे, सिकंदर मोमीन, विनोद वाघमारे, पंढरीनाथ भालेराव यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

विद्युतखांब मोडून पडल्याने पुंडी, वाहिरा, निमगाव बोडखा, घोंगडेवाडी, पारोडी, पिंपळगावदाणी, कानडी या परिसरातील विद्युतपुरवठा देखील संपूर्णपणे खंडीत झाला आहे. यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी केलेली चार्‍याची सोय याचेही नुकसान झाल्याने शेतकर्‍यांसमोर यक्ष प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाहिरा येथील 33/11 के. व्ही. उपकेंद्र संपूर्णपणे बंद पडले आहे. याकडे महावितरण कंपनीने तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.  त्याचप्रमाणे कांदा, फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासाठी प्रशासनाने फळबागांचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे. पुंडी येथील पडलेल्या घरांची तलाठी म्हस्के व मंडळ अधिकारी गवळी यांनी पंचनामे करून तहसील कार्यालयास अहवाल सादर केला आहे. या नैसर्गिक दुर्घटनेतील आपतग्रस्थांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत. यापूर्वी अवकाळी पावसामुळे पानाची देवळाली येथे 11 तर शेकापूर येथील 6 शेतकर्‍यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने हे शेतकरी उघड्यावर पडली आहेत.