Fri, May 24, 2019 06:24होमपेज › Marathwada › हिंगोलीत सर्वदूर पावसाची हजेरी

हिंगोलीत सर्वदूर पावसाची हजेरी

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 09 2018 12:03AMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वसमत तालुक्यातील काही नाल्यांना पूर आल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास पाहावयास मिळाले. वसमत तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. वसमत तालुक्याबरोबरच कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव व हिंगोली तालुक्यातही सकाळी 10 पयर्र्ंत जोरदार पाऊस झाला.

मागील दोन दिवसांपासून रिमझीम पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे मशागतीच्या कामास वेग आला असतानाच शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून जिल्हाभरात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्ष मृग नक्षत्राला सुरुवात झाली असली तरी, मान्सून दाखल न झाल्यामुळे पेरणीबाबत अद्यापही शेतकरी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतरच जिल्ह्यात पेरणीला सुरुवात होईल असे चित्र दिसून येत आहे. शुक्रवारी बाजारात खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली.  वसमत तालुकाभरात शुक्रवार रात्री जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक आंबा सर्कलमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात 24.85 मि मि सरासरी पावसाची नोंद झाली आहे. नदीनाले एक झाले असल्याने शेतजमिनी खरडून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.  वसमत तालुक्यात जोरदार पावसाने सुरुवात झाली.  दि. 8 जून शुक्रवार रोजी रात्री 1.30 वा पासून पावसास सुरुवात झाली होती. तालुक्यातील टेंभुर्णी सर्कलमध्ये 19 मिमी, वसमत 19 मिमी, हट्टा 06 मिमी, हयातनगर 18 मिमी, गिरगाव 38 मिमी, कुरुंदा 40 मिमी, सवार्र्ंत जास्त आंबा सर्कलमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण पाऊस 174 मिमी झाला. पाऊस एकूण सरासरी 24.85 एवढा झाला आहे. तब्बल 10 तास पाऊस झाल्याने नदीनाले एक झाले होते. कुरुंदा सुकळी नदीला पूर आला होता. नदी नाले काठावरील शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.