Sat, Mar 23, 2019 12:09होमपेज › Marathwada › भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या

भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:46AMहिंगोली : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकात 30 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी बुधवारी (दि. 8) भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडून निषेध नोंदविला. दरम्यान, गुरुवारी (दि. 9) हिंगोली जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. याबाबत शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आंदोलनाची रूपरेषाही स्पष्ट केली.

जिल्ह्यात हिंगोली, वसमत, सेनगाव या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. 8 ऑगस्टला हिंगोली येथील बेमुदत आंदोलनाचा दहावा दिवस होता. या दिवशी सकाळी ठिय्या आंदोलनस्थळी भजन झाले. त्यानंतर नर्सी नामदेव येथे परतवारीसाठी जाणार्‍या दिंडीचा आदरतिथ्य करून चहा व फराळाची व्यवस्था मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. नंतर हे ठिय्या आंदोलन पोलिस प्रशासनाला चकवा देत भाजप कार्यालयासमोर ठेवण्यात आलेला नियोजित ठिय्या ऐनवेळी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानासमोर करण्यात आला. यावेळी शेकडो आंदोलकांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर ठाण मांडून आक्रमक भावना व्यक्त केल्या.

आ. मुटकुळेंच्या निवासस्थानाला कुलूप असल्याने आंदोलकांनी आमदार साहेब.. मराठा समाजाचा प्रश्‍न आपण विधानसभेत मांडणे गरजेचे होते. आंदोलकांना भेटणेही महत्त्वाचे होते, पण आपण सपशेल या समाजात जन्मलात त्या समाजाकडे पाठ दाखवून पळपुटी भूमिका घेतली, असे म्हणत आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला, तर काही संतप्त आंदोलकांनी आमदार हे भाजपच्या दावणीला बांधले असून, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे गैर आहे, असेही मत व्यक्‍त केले. 

तब्बल दीड ते दोन तास झालेल्या या ठिय्या आंदोलनात एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्‍काचं, भाजप सरकारचं करायचं काय... आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. ठिय्या आंदोलनाच्या शेवटी संतप्त आंदोलकांनी  आमदारांच्या घरासमोर थुंकून आपला रोष व्यक्‍त केला. दरम्यान, या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलकांनी गांधी चौकातील आंदोलनस्थळी येऊन पुन्हा टाळ-मृदंगाच्या गजरात बैठे भजन सुरूच ठेवले.