Sun, Aug 25, 2019 12:28होमपेज › Marathwada › क्‍लासेस चालकांकडून आर्थिक लूट

क्‍लासेस चालकांकडून आर्थिक लूट

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:17AMअंबाजोगाई : प्रतिनिधी

रस्त्यावर साधी पान टपरी टाकायची असली तरी शॉप अ‍ॅक्टचा परवाना लागतो. गल्लीबोळात मोठ-मोठे हॉल घेऊन, प्रत्येक विषयाला मनमानी फिस आकारणार्‍या कोचिंग क्लासेसला नेमकी परवानगी कोणत्या खात्याची? याचा उलगडा होत नसल्याने कोणाचाही अंकुश नसलेले कोचिंग क्लासेस वाले पालकाची मात्र उजळ माथ्याने आर्थिक लूट करत असल्याचे चित्र दिसत आहे. पालकांनाही या क्‍लासेसची भुरळ असून ते पोटाला चिमटा लावून बिनभोभाट शुल्क भरतात.

गेल्या दोन वर्षांत कोचिंग क्लासेसचे पीक एवढ्यात जोमात फोफावले आहे, की अनेक शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांविना ओस पडले आहेत. लातूर शहरानंतर कोचिंग क्लासेस वाल्यांनी अंबेजोगाई शहराची निवड केल्याची स्थिती आहे. अनेक महाविद्यालय सुद्धा याबाबतीत फार गंभीर नाहीत. त्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन असल्याने कागदोपत्री हे महाविद्यालय सुरू असतात, मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र असते. कोचिंग क्लासेसच्या फीस एवढ्या गगनाला भिडल्या आहेत, की सामान्य गरीब पालक एवढी फीस देऊ शकत नाही, या उपरही मुला-मुलींच्या आग्रहाखातर प्रसंगी कर्ज काढून का असेना पालकांना फीस भरावीच लागते.

अंबाजोगाई शहरात पूर्वी मुलींच्या छेडछाडीच्या घटना क्वचित घडत होत्या. त्यामुळे अनेक मुलीच्या पालकांनी शहरात किरायाने खोल्या घेऊन मुला मुलीच्या शिक्षणासाठी शहरात वास्तव्य केले. यामुळे कोचिंग क्लासेसला मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. शहरात किराणा दुकान  अथवा पान टपरीचे व्यवसाय कमी एवढे क्लासेस आहेत! विशेष म्हणजे कोचिंग क्लास हा व्यवसाय शिक्षण विभागाशी निगडीत असल्याने यासाठी परवानगी जिल्हा शिक्षण विभाग यांनी द्यावयास पाहिजे होती, मात्र गटशिक्षणाधिकारी पासून जिल्हा शिक्षणाधिकारी सोनवणे पर्यंत विचारणा केली असता, शिक्षण विभागाने कुठल्याही कोचिंग क्लासेसला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाने कोचिंग क्लासेसला परवानगीच दिली नसल्याने कारवाई बाबत शिक्षण विभागाकडून हात वर करण्यात येत आहे. 

शिक्षण क्षेत्राशी निगडीत काही मान्यवर यांच्या चर्चेत कोचिंग क्लासेस वाल्यांना परवानगी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय देते, अशी माहिती मिळाल्यामुळे राज्याचे धर्मादाय आयुक्त दिघे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. त्यांनीही स्पष्टपणे आपल्याला या संदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. कोचिंग क्लासेस वाल्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी असेल तर या कार्यालयाने कधीही कोचिंग क्लासेस ची तपासणी केलेले नाही, त्यामुळे नेमकी परवानगी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने प्रत्येक क्षेत्रातील  मनमानी भ्रष्टाचाराला आळा घातला. अनेक क्षेत्रातील भ्रष्टाचार घालवण्याचा प्रयत्न शासन करत आहे. कोचिंग क्लासेसवाले पालकांना दिवसाढवळ्या आर्थिक लूट करत असतात, याबद्दल शिक्षण विभाग असो की पोलिस विभाग यांच्या परवानग्या का तपासत नाही अशी पालकांत चर्चा सुरू आहे.

कोचिंग क्‍लास चालकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने, वा त्यांची तपासणी होत नसल्याने पालकांकडून एका विद्यार्थ्यांची सात ते नऊ हजार रुपये फीस उकळली जाते. त्या तुलनेत शिक्षण मिळते का? हाही प्रश्‍न आहे. त्यामुळे यावर आवाज उठविण्याची आता वेळ आल्याचे नागरिकांचे 
म्हणणे आहे.