बीड : प्रतिनिधी
ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख पुसून जिल्ह्यातील शिक्षक शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचे काम होत आहे. यातूनच चांगले विद्यार्थी घडतील असा विश्वास खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला. त्या सोमवारी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात सोमवारी बोलत होत्या.
मंचावर साहित्यिक रंगनाथ तिवारी, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपाध्यक्षा जयश्री मस्के, शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, शोभा दरेकर आदींची उपस्थिती होती. खा. डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, की जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक काम करीत आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणात अनेक समस्या आहेत, या समस्या असुनही शिक्षकांकडून अविरत चांगले कार्य केले जात आहे. यामुळे चांगले विद्यार्थी घडत आहेत. असे आदर्श कार्य करणार्या शिक्षकांचा गौरव करणे, ही आपली जबाबदारी असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी साहित्यिक रंगनाथ तिवारी म्हणाले, की जो समाज शिक्षकांचा सन्मान करतो तो समाज मोठ्या उंची पर्यंत पोहोचत असतो. शिक्षकांवरच येणारी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. समाजात महत्वाचे स्थान शिक्षकांचे आहे असे सांगत तिवारी यांनी सध्याच्या व्यवस्थेवर खंत व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 18 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अखेर मिळाला मुहूर्त
पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी वेगवेगळ्या कारणामुळे दोन वेळा मुहूर्त काढूनही कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. पुरस्कारसाठी शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यानंतरही पुरस्कार दिले जात नसल्याने शिक्षकांमधून पुरस्कार वितरण केले जावे, अशी मागणी होत होती. या संदर्भात दै. पुढारीने वृत्त प्रकाशित करून शिक्षकांच्या अपेक्षा मांडल्या होत्या. अखेर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.