Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Marathwada › कारागृहातून पळालेला कैदी रुग्णालयात सापडला

कारागृहातून पळालेला कैदी रुग्णालयात सापडला

Published On: Mar 15 2018 7:37PM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMबीडः प्रतिनिधी

शहरातील जिल्हा कारागृहातून दोन कैद्यांनी पळून जाण्याचा प्रत्यन केला मात्र त्यातील एकाच कैद्याला जेलच्या बाहेर उडी मारण्यात यश मिळाले. परंतु कारागृहाच्या उंच भिंतीवरुन उडी मारल्याने तो कैदी थेट जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. ही घटना गुरुवारी सकाळी पहाटे 5.30 च्या सुमारास घडली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलिसांना उप-महानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी  यांनी तडकाफडकी निलंबित केले. 

ज्ञानेश्वर बालाजी जाधव (30, रा.रेणापूर जि.लातूर) व विकास मदन देवकते अशी पलायन प्रकरणातील कैद्यांची नावे आहेत. गुरूवारी पहाटे स्वयंपाक बनविण्यासाठी कैद्यांना बाहेर काढले होते. पहाटे थोडा अंधार असल्याने जाधव व देवकते हे दोघे विहिरीकडे पाणी भरण्याच्या बहाण्याने गेले. मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून ते भिंतीवर चढले. पहिल्यांदा ज्ञानेश्वर याने भिंतीवरून खाली उडी मारली आणि तो गंभीर जखमी झाला. मात्र देवकते याचे उडी मारण्याचे धाडस झाले नाही त्यामुळे तो पुन्हा बराकीकडे आला. 

ज्ञानेश्वर जाधव हा जखमी असल्याने त्याला इतरत्र पळता आले नाही.  साध्या कपड्यात असलेला ज्ञानेश्वर बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहून काही नागरिकांनी त्याला रिक्षातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, कैदी पळून गेल्याची माहिती कारागृह अधीक्षक पवार यांना मिळताच त्यांनी शोध मोहिम सुरु केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देवकते दिसल्याने त्याची चौकशी केली असता जाधव हा त्याच्या नातेवाईकांकडे जाणार असल्याचे समजून आले. त्यामुळे पोलिसांनी शोध सुरू केला. संपूर्ण शहर पछाडल्यानंतर शेवटी जिल्हा रुग्णालयात जाधव हा उपचार घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. या प्रकरणी जाधव व देवकते यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेच्या अनुषंगाने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 

चोरी प्रकरणी आहे कारागृहात
ज्ञानेश्वर जाधव हा चोरी प्रकरणी कारागृहात आहे तर विकास हा बलात्काराच्या आरोपात कारागृहात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

15 फुटांच्या भिंतीवरुन मारली उडी
जाधव व देवकते दोन्ही कैदी सुरक्षा भिंतीला असलेल्या एका खिडकीच्या सहाय्याने संरक्षक भिंतीवर चढले. मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंती वरुन उडी मारली. ही भिंत जवळपास 15 फु ट उंच आहे.  ज्ञानेश्वरने खाली उडी मारली तर विकास उडी न मारताच परतला. ज्ञानेश्वर जखमी झाल्याने रक्त पडले होते. याच रक्ताच्या आधारे कारागृह पोलीस रूग्णालयात पोहचले असता त्यांना तेथे उपचार घेत असलेला ज्ञानेश्वर दिसला.

दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित
सदरील घटनेच्या अनुशंगाने कारागृह उप-महानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी कारागृहाला भेट देऊन पाहणी केली.  पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शामराव मस्के व रमेश वामनराव हंडे या दोन कर्मचार्‍यांना कर्तव्यात कसूर केल्याने तडकाफडकी निलंबीत केले. तसेच कारागृहाची सुरक्षा वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्ध साधून आवश्यक त्या सूचनाही धामणे यांनी त्यांना दिल्या.
पहाटे दोन बंदी पाणी आणण्यासाठी  विहिरीवर गेले होते. अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. एक परतला तर दुसर्‍याने पलायन केले. दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. 

एम.एस.पवार कारागृह अधीक्षक, बीड