होमपेज › Marathwada › जिल्हा कारागृहात कैद्यांनी फुलविली शेती

जिल्हा कारागृहात कैद्यांनी फुलविली शेती

Published On: Jan 26 2018 1:18AM | Last Updated: Jan 26 2018 12:38AMबीड : उत्तम हजारे

येथील कारागृहात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी कारागृह परिसरातील साडेचार एकर शेती फुलविली असून, भाजीपाला व इतर पिके घेतली आहेत. सध्या ही पिके बहरात आली आहेत. या शेतीतील भाजीपाला व धान्याचे भोजन दररोज कैद्यांना दिले जाते. 

बीड शहरातील नगररोडवर असलेल्या कारागृहात 275 कैदी विविध गुन्ह्याखाली बंदिस्त आहेत. कारागृह परिसरात साडेचार एकर शेती आहे. कारागृहातील कैद्यांच्या मदतीने या शेतीत विविध पिके घेतली जात आहेत. दररोज तीन ते चार कैद्यांना शेतीचे काम दिले जाते. सध्या या शेतीत वांगे, टोमॅटो, भेंडी, पालक, मेथी अशी भाजीपाल्यांची शेती बहरली आहे. एक एकरमध्ये ज्वारीचे पीक असून, ते सध्या हुरड्यात आले आहे. कारागृहातील कैद्यांना याच भाजीपाल्यांचे भोजन दररोज दिले जाते. अधिकचा भाजीपाला उत्पन्न झाला तर तो बीड येथील मार्केटमध्ये विक्री केला जातो.

कारागृहात विविध कार्यक्रम
कारागृहातील कैद्याचे मनपरिवर्तन करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रवचन, पथनाट्य, शिबीर, एड्स जागृती कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले जातात. यातून कैद्यांचे मनपरिवर्तन केले जाते. कैद्यांच्या आरोग्य तपासणीवरही भर दिला जातो.

शेतात पिकलेला ताजा भाजीपाला, कैद्यांच्या आरोग्याला चांगला असतो,  त्या शिवाय ठरल्याप्रमाणे त्यांना योग्य आहार देण्यात येतो. सध्या विविध कार्यक्रम घेऊन कैद्यांचे मनपरिवर्तनाचे काम जोरात सुरू असून, याचा लाभ कैद्यांना होत आहे. 
एम. एस. पवार, अधीक्षक जिल्हा कारागृह