Sun, Nov 18, 2018 04:57



होमपेज › Marathwada › जिल्हा रुग्णालयातू तो कैदी अखेर पळालाच

जिल्हा रुग्णालयातू तो कैदी अखेर पळालाच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





बीडः प्रतिनिधी

येथील जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला कैदी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. रुग्णालयात उपचार सुरु असताना कैदी ज्ञानोबा बालाजी जाधव याने स्वच्छतागृहात असताना काचेने गळा चिरुन घेण्याचा प्रयत्न दोन दिवसापूर्वी केला होता. शेवटी सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून ज्ञानोबाने अखेर पळ काढलाच. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.  

१५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून ज्ञानोबाने भिंतीवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला होता; परंतु उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारल्याने  तो जखमी झाला होता.  त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. पुन्हा २४ मार्च रोजी शौचालयाला जाण्याचा बहाणा करीत तो शौचालयात गेला व खिडकीतील काचाने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातून बचावल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू होते. त्याच्या निगराणीसाठी ए. पी. चव्हाण नामक पोलीस हवालदार नियुक्त केला होता.

सोमवारी दुपारच्या सुमारास चव्हाणही शौचास गेले होते. हीच संधी साधून ज्ञानोबाने हातकडी काढून जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. हा प्रकार चव्हाण यांना परतल्यानंतर लक्षात आला. त्यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ, एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर, पो.उप.नि. भूषण सोनार यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली; परंतु त्यांना आरोपी शोधण्यात अपयश आले. हा प्रकार पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी तात्काळ पथके नियुक्त करुन आरोपीच्या शोधासाठी रवाना केली.

दरम्यान,  ज्ञानोबा हा अंबाजोगाई येथील एका चोरीच्या प्रकरणात कारागृहात होता. त्याचा जामीन मिळविण्यासाठी ज्ञानोबाचा छोटा भाऊ प्रयत्नशील होता. ३१ मार्च रोजी त्याचा जामीन होणार असल्याचे  सूत्रांकडून समजते. मात्र, तत्पूर्वी ज्ञानोबाने पलायन केले.  ज्ञानोबाच्या आईचा अपघात झाल्याने त्या वॉर्ड क्र. ७ मध्ये उपचार घेत आहेत. त्याची छोटी बहीण आईसोबत आहे. पळून जाण्यापूर्वी आई व बहीण त्याला भेटले होते, असे समजते.

Tag : prisoner, escape, from beed, central, jail, 






  •