Fri, Nov 16, 2018 15:46होमपेज › Marathwada › आजेगाव येथे पुजार्‍याचा खून

आजेगाव येथे पुजार्‍याचा खून

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 04 2018 10:39PMसेनगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिरात चाळीस वर्षीय पुजार्‍याचा एका अज्ञात व्यक्‍तीने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गोरेगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील आजेगाव येथील गजानन काशिनाथ भालेराव यांनी गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यात नमूद करण्यात आले की, त्यांचा भाचा शिवदास श्रीराम सौदागर (वय 40) हा नेहमीप्रमाणे नागझरी महादेव मंदिरावर आरती करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी गेले होते. कोणीतरी अज्ञात इसमाने पुजारी सौदागर पूजा करत असताना धारदार शस्त्राने शरीरावर डावीकडून व चेहर्‍यावर डोक्यात, पाठीवर तसेच हाता-पायावर वार करून खून केला. पुजारी बेसावध असताना अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने शरीरावर वार केल्याने मंदिरात रक्‍ताचा सडा पडला होता. पुजारी यांच्यावर वार करताच त्याचा आवाज ऐकून लगतच्या मंदिरातून दोन नागरिक धावून आले. पुजार्‍याचा खून करून दुचाकीवरून अज्ञात इसम फरार झाला. खुनाचे कारण निष्पन्‍न झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्‍वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, सपोनि एम. एम. कोरंटलू, पोउपनि बी. आर. तिप्पलवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. बुधवारी आजेगाव येथे पुजारी सौदागर यांचा मृतदेह दर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आला होता. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील काटा येथे मूळ गावी अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यात आला.