Fri, Feb 28, 2020 18:05होमपेज › Marathwada › जया नाही पंढरपुरा त्याने जावे केसापुरा

जया नाही पंढरपुरा त्याने जावे केसापुरा

Published On: Jul 11 2019 8:14PM | Last Updated: Jul 11 2019 8:14PM
वडवणी (जि. बीड) : अशोक निपटे

आपल्या संसारीक अडचणीमुळे इच्छा असुनही भक्ताला पंढरपुरला जाणे घडले नाही तर घाबरू नका, कारण आपल्या जवळचे देवस्थान असणाऱ्या केसापुरीच्या केशवराजाच्या दर्शनासाठी केसापुराला जा, असा संदेश जया नाही पंढरपुरा त्याने जावे केसापुरा या ओळीतून संत नामदेवाने दिल्याचे सांगण्यात येते.

हिंदू संस्कृतीत सण उत्सवांना मोठे महत्व आहे. वर्षातील चोवीस एकादशी पैकी आषाढी ही सर्वात मोठी एकदशी मानली जाते. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक देहू, आळंदीसह राज्य परराज्यातून पायी चालत येतात. मात्र संसारीक अथवा इतर आडचणींमुळे ज्या भाविकांना पंढरपुरला जाऊन पांडूरंगाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा भाविकांनी आपल्या जवळच्या केसापुरी येथील केशवराजाचे दर्शन घेतले तरी पाडूरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळतो असे संत नामदेवाने आपल्या गाथेत म्हटल्याचे वारकरी सांगतात. वडवणी जवळील केसापुरी येथील केशवराजाचे मंदिर प्रसिद्ध आहे. आशाढी एकादशीला येथे बीड जिल्ह्यातील हजारो भाविक गर्दी करतात. भक्ताला पावणारा देव म्हणून केशवराजाची ख्याती आहे. 

इतर ठिकाणी कृष्णाच्या मुर्तीत सुदर्शन चक्र उजव्या हातात आहे, मात्र केसापुरी येथील मुर्तीत चक्र डाव्या हातात आहे. दुग्ध शर्करा अभिषेक घालताना मुर्ती हसल्याचा भास भाविकांना होतो.


तालुक्यातील तिर्थस्थळाची गैरसोय
आषाढी एकादशी निमित्त केशवरा मंदिरासह पिंपरी येथील राजा हरिश्चंद्र मंदिरातही मोठी यात्रा भरते मात्र या दोन्ही ठिकाणी कोणत्याही सोयी प्रशासन देत नाही. या दोन्ही ठिकाणी कोणताही पोलिस बंदोबस्त अथवा पाण्याची, निवाऱ्याची सोय प्रशासनाने केली नाही. एवढेच नाही तर भाविकांना जाण्यासाठी रस्तेही नीट नाहीत आणि एस. टी बसही उपलब्ध नसल्याने भाविकांची कसरत होणार आहे.