Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Marathwada › चोरांच्या सक्रियतेपुढे पोलिसांची निष्क्रियता उघड

चोरांच्या सक्रियतेपुढे पोलिसांची निष्क्रियता उघड

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 10 2018 9:41PM अंबासाखर : प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरात चोरीच्या घटना घडत आहे. शुक्रवारच्या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील गंठण पळवून नेल्याच्या घटना घडल्या. महिनाभरात चोरट्यांच्या सक्रियतेपुढे पोलिसांची निष्क्रियता उघड झाल्याची टीका शिवसेनेचे प्रशांत आदनाक यांनी केली आहे. 

शुक्रवारच्या बाजारातून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या वाढत्या घटनेमुळे काही समाजसेवी संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना निवेदन देऊन पोलिसांची गस्त भाजीपाला बाजाराच्या परिसरात वाढवण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिसांनी पथक नेमलेही मात्र ते पथक पोलिसांच्या जाळी असणार्‍या वाहनातून मुख्य रस्त्यावरून फिरू लागले. पोलिस रस्त्यावर उतरून गर्दीत फिरताना दिसत नसल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. बाजाराच्या दिवशी शिक्षिका वर्षा चंद्रकांत तोडकर मांडवा रोडवरील बाल रुग्णालयासमोर भाजी खरेदी करत होत्या. दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी 75 हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे गंठण लांबविले, तसेच शीतल नागरी पतसंस्थेतील रोखपाल शर्मिला कुलकर्णी यांच्या गळ्यातील 11 ग्रॅम सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसका देऊन पळ काढला. भाजीपाला बाजारात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून महिला पोलिस कर्मचारी बाजारा दिवशी रस्त्यावर नेमण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष उल्हासराव पांडे यांनी केली आहे.

चोरट्यांवर पोलिस कडक कार्यवाही करत नसल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली. त्यांनी थेट स्ट्राँग रूमवर हल्ला चढवला.  पोलिसांचा गुन्हेगारावर वचक पाहिजे, तोच कमी झाल्याने चोरांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिस अधिकारी गित्ते यांची बदली करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीचे राजेश व्हावळे यांनी केली आहे.
 महिलांसाठी सर्वात सुरक्षीत शहर म्हणून ओळख असणार्‍या अंबाजोगाई शहरात महिलांच्या गळ्यातील गंठण चोरीच्या घटना असोत की इतर घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षा धोक्यात आल्याचे प्रतिभा देशमुख म्हणाल्या.

महिला पोलिसांची संख्या नगण्य

अंबाजोगाईचे शहर असो अथवा ग्रामीण पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचार्‍यांची संख्य नगण्य असून ती संख्या वाढवून शहरात दामिनी पथके नेमावेत अशी मागणी प्रा.सुलभा सोळंके यांनी केली आहे.       
आरोपीचा कसून तपास सुरू   

अंबाजोगाई शहरातील चोरीच्या घटनेतील आरोपी असो की, न्यायालयातील झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक अशी दोन स्वतंत्र पथके रवाना झाली आहेत. आरोपींचा कसून तपास सुरू आहे.
- सोमनाथ गित्ते, पोलिस निरीक्षक, अंबाजोगाई (शहर)