Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Marathwada › कर्मचारी वसाहत नसल्यामुळे पोलिसांची होतेय अडचण 

कर्मचारी वसाहत नसल्यामुळे पोलिसांची होतेय अडचण 

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 19 2018 11:18PMबोरी : मारुती गायकवाड 

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पोलिस ठाणे आहे. मात्र पोलिस कर्मचार्‍यांसाठी बांधलेल्या वसाहतीची दुरवस्था झाल्याने त्यांना राहण्यासाठी मोठी अडचण होत आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचारी सोयीच्या ठिकाणांहून ये-जा करीत आहेत. 

बोरी येथील जिंतूर-परभणी रोडवरील पोलिस कर्मचारी वसाहतीची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांना दररोज अप-डाऊन करावे लागत आहे. बोरी व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना निवासस्थानाची सोय नसल्याने भाडेतत्त्वावर इतर  ठिकाणी राहावे लागत आहे.  येथील कर्मचारी वसाहत तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. ती आता पूर्णतः मोडकळीस आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी कर्मचार्‍यांना राहता येत नाही. तसेच सोयी सुविधांचा अभाव आहे. बोरी ठाण्यात 35 कर्मचारी,  तीन अधिकारी असे एकूण 38 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना इतर ठिकाणाहून अप डाऊन करावे लागते.  तसेच त्यांच्यावर बोरी व परिसरातील गावांची जबाबदारी आहे. 

बोरी ठाण्यांतर्गत 58 गावे येतात आणि 4 बीटच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येते.  चार बीट - बोरी, कौसडी, वर्णा आणि दुधगाव हे आहेत. कर्मचार्‍यांना राहण्यासाठी निवासस्थाने नाहीत. जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र झटणार्‍या पोलिसांनाच त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांत असंतोष निर्माण झाला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

निवासस्थानांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू ः पोलिस वसाहतीत राहण्यायोग्य निवासस्थाने नसल्याने ठाण्यात कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना नाईलाजास्तव इतरत्र ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी लागत आहे. निवास व्यवस्थेसाठी संबंधित विभागाला पत्र देऊन पाठपुरावा केला आहे. 
-गजेंद्र सरोदे,  सहायक पोलिस निरीक्षक.