Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Marathwada › परभणीत बडतर्फ वाहकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न 

परभणीत बडतर्फ वाहकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न 

Published On: Jan 10 2018 7:03PM | Last Updated: Jan 10 2018 7:03PM

बुकमार्क करा
परभणीः प्रतिनिधी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगारात कार्यरत असताना पैशांचा अपहार केल्यावरून बडतर्फीची कारवाई झालेल्या वाहकाने सेवेत पुन्हा रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी गोंधळ घालत विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर बुधवारी (दि.20) सकाळी 10 च्या सुमारास अंगावर रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षक व इतर कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखून त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. 

हिंगोली आगारात कार्यरत वाहक दीपकसिंह शिसोदिया यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एसटी बुकिंगचे पैसे कार्यालयात न भरल्याच्या कारणावरुन बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. अनेकदा मागणी करूनही त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात परिवहन महामंडळाने 8 कर्मचार्‍यांवर कारवाई झाली होती. त्यात शिसोदिया यांच्या प्रकरणावर अपील चालू आहे. 

निकाल लागल्यानंतर नियुक्‍तीचा विचार होईल. परंतु वाहक शिसोदिया यांनी इतरांना अधिकार्‍यांनी पैसे घेऊन कामावर नियुक्‍त करून घेतल्याचा आरोप केला आहे. परंतु पैसे न दिल्यामुळे त्यांना जाणिवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोपही शिसोदिया यांनी केला आहे. नोकरीत नसल्याने सिसोदिया यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातून त्यांनी बुधवारी जाळून घेण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकरणी कोतवाली ठाण्याचे उपनिरीक्षक गुलाबराव राठोड यांनी घटनास्थळी जाऊन शिसोदिया यांना तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी परिवहन महामंडळाचे गोविंद भुजंगराव मरहोये यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याच्या कारणावरून कलम 309 नुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक के. आर. जंत्रे करीत आहेत. 

अपिलावरील निकाल बाकी हिंगोली आगाराच्या सदरील वाहकास मार्च 2017 मध्ये बडतर्फ करण्यात आले. त्याला कामावर घेण्यासाठी अपिल करण्याची मुभा होती. त्यानुसार त्याने विभागीय कार्यालयाकडे कामावर रुजू करून घेण्याकरिता अपिल दाखल झाले होते. त्यावर 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाली असून याबाबत योग्य तो अभ्यास करून निर्णय द्यावा लागतो. हा निर्णय लवकरच देण्यात येणार आहे.  
    - जालिंदर सिरसाठ, विभागीय नियंत्रक, परभणी.