Mon, Jun 17, 2019 02:17होमपेज › Marathwada › परभणी : थकीत मानधनासाठी शिक्षण विभाग कार्यालयाची तोडफोड

परभणी : थकीत मानधनासाठी शिक्षण विभाग कार्यालयाची तोडफोड

Published On: Jan 15 2018 4:19PM | Last Updated: Jan 15 2018 4:18PM

बुकमार्क करा
परभणी : प्रतिनिधी 

शालेय पोषण आहार योजनेत काम करणार्‍या कामगारांना मानधन मिळण्यास प्रत्येक वेळेस विलंब होत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांना निवेदने देवूनही ठोस भुमिका न घेतल्‍याने आज 15 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या  सुमारास पुर्णा व परभणी तालुक्यातील 10 ते 15 कामगारांनी शिक्षण विभाग कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पुर्णा व परभणी तालुक्यातील काही कामगारांचे दोन महिन्याचे मानधन मागील चार ते पाच महिन्यापासुन थकीत आहे. यात 76 स्वयंपाकी व मदतनीसांचा समावेश आहे. जिल्हाभरात तब्बल साडेतीन हजार कामगार आहेत. यांचे मानधन हे आरटीजीएसच्या माध्यमातून बँकेत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. पण शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारामुळे हे मानधन वेळेवर बँकेत जमा केले जात नाही असा आरोप कामगार संघटनेने केला आहे. यासाठी कामगारांनी वेळोवेळी गट शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. पण त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील कामगारांनी अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी तुमचे मानधन काही दिवसात तात्काळ मिळेल अशी व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले. याला एक महिन्याचा कालावधी लोटला तरी हे मानधन मिळाले नाही. यात शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याचे बोलले जात आहे. यातच कामगारांची होणार्‍या पिळवणुकीमुळे शालेय पोषण आहार संघटनेचे अध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास 10 ते 15  महिला व पुरूष कामगार प्राथमिक शिक्षण विभागात दाखल झाले. यावेळी शिक्षणाधिकारी आशा गरूड या सीईओंकडे कामकाजासाठी गेलेल्या होत्या. त्यांची अर्धा तास वाट पाहत बसलेले कामगार शेवटी संतप्‍त झाले. यातुनच या संतप्‍त कामगारांनी शिक्षण विभागातील काचांची तोडफोड केली. खुर्च्या अस्ताव्यस्त फेकल्या व कपाटांचीही नासधुस केली. यात शिक्षण विभागातील साहित्याचे तब्बल 50 हजाराच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा प्रकार घडल्यानंतर तात्काळ कोतवाली ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नासधुस करणार्‍या कामगारांना ताब्यात घेतले. यानंतर शिक्षणाधिकारी आशा गरूड व कर्मचारी यांनी कोतवाली ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.