Thu, Aug 22, 2019 08:11होमपेज › Marathwada › धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवार केला : पंकजा मुंडे

धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवार केला : पंकजा मुंडे

Published On: Dec 11 2017 6:18PM | Last Updated: Dec 11 2017 6:47PM

बुकमार्क करा

परळी : प्रतिनिधी

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हत तर, घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? तसेच घटनास्थळावर जाण्यास मनाई करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्यही चुकीचे  असे मत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा खासदार पंकजा मुंडे यांनी व्यक्‍त केले आहे. धनंजय मुंडे यांना रोखण्याऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अधिवेशनात बघून घेऊ अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होते. असेही पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या. 

पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या, ‘‘वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बारा कर्मचारी जखमी झाले, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना हादरून टाकणारी होती. या घटनेनंतर जखमींना योग्य उपचार देणे, कारखान्यातील यंत्रणेला मनोबल देणं हे प्रथम कर्तव्य असतं, जे आम्ही व आमच्या संचालकांनी चोखपणे बजावण्याचा प्रयत्न केला. जखमी कर्मचाऱ्यांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी जखमींना लातूरला हलविण्यासाठी अॅम्ब्यूलन्स मिळवण्यासाठी संचालक व कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आर्थिक व्यवस्थेबरोबर त्यांना मानसिक आधार देण्याचं काम आम्ही केले आहे.’’ 

त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘याउलट घटना घडल्यानंतर जखमींना मदत करायची सोडून काहींनी कारखान्यातील घटनास्थळ गाठून, फोटो काढून स्वतःच्या शाबासकीच्या बातम्या स्वतःच देणं आणि कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं त्यांनी केलेलं स्टेटमेंट  राजकारणानं बरबटलेलं होतं.’’ 

मुंडे म्‍हणाल्‍या, ‘‘वैद्यनाथची दुर्घटना हा अपघात आहे की आणखी काय? हे रिपोर्ट आल्यावरच कळेल. कारखान्याची टीम सुद्धा याचा तपास करीत आहे. कुठल्याही अपघाताचे घटनास्थळ हे विविध तपासणीसाठी योग्य रहावे यासाठी सील ठेवणे आवश्यक असते, मी स्वतः ,आमचे संचालक मंडळ व कार्यकर्ते जखमींच्या उपचारामध्ये व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पुढारी व कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन फोटो काढत असल्याचे आढळले. तपासणीला यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता वाटल्याने घटनास्थळावर तपासणी अधिकारी व संबंधित वगळता कोणीही जाऊ नये हा योग्य निर्णय घेऊन आम्ही पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यावर पोलिसांनी कारवाई करणे योग्यच होते. या निवेदनात कोणत्याही व्यक्तीचे नाव अधोरेखित केले नव्हते, त्यामुळे आपल्याला रोखण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे आहे,  रोखण्याऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अधिवेशनात बघून घेऊ अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होते.’’  

दुर्घटनेनंतर कारखान्यातील गाळप पुन्हा सुरळीत सुरू 
वैद्यनाथ सहकारी कारखान्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस बंद असलेले गाळप पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून गाळपास सुरुवात करण्यात आली असून, दैनंदिन सरासरीप्रमाणे गाळप सुरू झाले आहे.

या घटनेमुळे दोन दिवस गाळप बंद ठेवावे लागले होते. या घटनेनंतर कारखान्यातील तांत्रिक व्यवस्था ठिक करून गाळप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दुर्घटनेतील जो ज्युस टॅन्क (सेमी क्रेशनर) आहे, त्याला बायपास करून पुढील ज्युस  टॅन्कवर ज्युस लाईन जोडून घेण्यात आली आहे. गाळप पुर्ववत सुरू झाले असून, रविवार मध्यरात्रीपासून सोमवारी दिवसभरात सरासरीप्रमाणे दोन हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. 

गळीत हंगाम सुरू झाल्यापासून कारखान्याचे गाळप सरासरीप्रमाणे सुरू आहे. जवळपास दीडलाखा पर्यंतचे  गाळप आत्तापर्यंत झालेले आहे. घडलेल्या आपघाती दुर्घटनेमुळे दोन दिवस खंड पडला असला तरी, आता गाळप सुरळीत सुरू आहे.