Mon, Jun 24, 2019 21:50होमपेज › Marathwada › पंकजा मुंडेंच्या भावाच्या कारचा अपघात, १ ठार, ४ जखमी 

पंकजा मुंडेंच्या भावाच्या कारचा अपघात, १ ठार

Published On: Dec 25 2017 9:02AM | Last Updated: Dec 25 2017 9:30AM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

अंबाजोगाई शहाराजवळील अंबासाखर रोडवरील वळणावर भरधाव फोर्ड इंडेवर कार झाडाला धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण ठार तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांचा समावेश आहे. हा अपघात रविवारी रात्री ९.४५ वाजता झाला.

रामेश्वर मुंडे अन्य चार जणांसोबत फोर्ड इंडेवर कारमधून (एमएच १२ एनव्ही १२१२) अंबासाखरकडून अंबाजोगाईच्या दिशेने येत होते. तिरंगा हॉटेल समोरील वळणावर आले असता कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका झाडावर जाऊन आदळली. अपघातात कारमधील धनराज कचरू बिडगर (वय ३४, रा. दाऊतपूर) यांचा मृत्यू झाला तर, रामेश्वर व्यंकटराव मुंडे (वय ३५, रा. नाथरा), ज्ञानोबा नाथराव कराड (वय ३१, रा. इंजेगाव), विलास सोपान जाधव (रा. परळी) आणि परमेश्वर दवणे (रा. कौडगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रामेश्वर मुंडे यांना गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अजय मुंडे, संजय दौंड, रमेशराव आडसकर, राजेसाहेब देशमुख, गणेश कराड, कमलाकर कोपले, सतीश केंद्रे आदींनी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. नितीन चाटे यांनी उपचारावर लक्ष ठेवले आहे.

१०८ धावली मदतीला

अपघात होताच घटनास्थळावर उपस्थित लोकांनी रुग्णवाहिकेला फोन लागत नसल्याने ‘विवेक सिंधु’ला अवघ्या १० मिनिटात अपघाताची माहिती दिली. ‘विवेक सिंधु’च्या वतीने तातडीने १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ. सचिन कस्तुरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावर डॉ. कस्तुरे यांनी चालक रमेश कांबळे यांच्यासह रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळ गाठले. तोपर्यंत काही युवकांनी तिघा जखमींना रिक्षातून रुग्णालयात दाखल केले होते नंतर, घटनास्‍थळी असलेल्या नागरिकांनी कार झाडापासून बाजूला काढली. कारमध्ये अडकलेल्या रामेश्वर मुंडे यांना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून स्वाराती रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.