होमपेज › Marathwada › पद्मश्री शब्बीर मामुंच्या गाईंना सर्वतोपरी मदत

पद्मश्री शब्बीर मामुंच्या गाईंना सर्वतोपरी मदत

Published On: Jun 13 2019 5:40PM | Last Updated: Jun 13 2019 5:40PM
शिरुर (जि. बीड) : प्रतिनिधी

आयुष्यभर निस्वार्थीपणे गाईंचा सांभाळ करणाऱ्या पद्मश्री शब्बीर मामुंनी नुकतीच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी केंद्रेकर यांनी शब्बीर मामु आणि त्यांच्या गाईंची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शिवाय मामुंच्या सांभाळत असलेल्या गाईंसाठी आपण सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे देखील केंद्रेकर यांनी सांगितले.

यावेळी केंद्रेकर आणि शब्‍बीर मामु यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. जिल्हाधिकारी असताना केंद्रेकर हे शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते .त्या वेळी शब्बीर मामु निस्वार्थीपणे गोपालनाचे काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते मुद्दाम भेट देण्यासाठी गोशाळेत आले. या वेळी केंद्रेकर यांनी शब्बीर मामुंकडे गाय विकत देण्याची मागणी केली. मामुंनी त्यांना स्पष्ट नकार दिला. परंतु केंद्रेकरांनी हट्ट सोडला नाही. हवे तेवढे पैसे घ्या पण गाय द्या, अशी आग्रही मागणी लावून धरली.

शब्बीर मामुंनी गाईंप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा ढळू न देता गाय विकत देण्यास विरोध केला आणि केंद्रेकरांनी घेतलेल्या परीक्षेत ते यशस्वी झाले. त्या नंतर केंद्रेकर जो पर्यंत बीडमध्ये राहिले तो पर्यंत त्यांनी अप्रत्यक्षरित्या मामुंना मदत केली. मामुंना भारत सरकारने प्राणी संवर्धन क्षेत्रात गोसेवा पालनाचे काम केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले अआहे.

पुरस्‍कार वितरण झाल्यानंतर पदमश्री शब्बीर मामुंची केंद्रेकरांना भेटण्याची इच्छा होती. त्यानुसार बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात भेट झाली. केंद्रेकरांनी मामुंना आपण किती दिवसांपूर्वी भेटलो होतो? असा प्रश्न केला. तसेच आपले काम प्रेरणादायी असून आपल्यासारखे देखील अनेक लोक घडवा असा सल्ला दिला.

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती केली जाते. उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्यासाठी टँकरने पाणी आणावे लागते आणि आपले लोक ऊस लागवड करतात. हा विरोधाभासाचा प्रकार आहे. त्यामुळे उसाच्या शेतीला आपला विरोध आहे. दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर आपल्याला पाण्याचे व्यावस्थापन करणे गरजेचे आहे. 

- सुनिल केंद्रेकर (विभागीय आयुक्त, औरंगाबाद)