Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Marathwada › प्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला

प्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 04 2017 1:37AM

बुकमार्क करा

उस्मानाबाद : प्रतिनिधी

महाजन कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या उस्मानाबादेत जमिनीच्या वाटणीवरून सध्या नव्याने वाद पेटला आहे. त्यातच सारंगी यांनी पती प्रवीण महाजनांच्या मृत्यूवरून आरोप केल्याने वादाला नवे वळण मिळाले आहे.

उस्मानाबाद शहरातील बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या 29 गुंठे जमिनीवरून हा वाद सुरू आहे. ही जमीन तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टला प्रमोद महाजन यांनी दान दिली होती. त्यानंतर तिथे त्यांचे वडील व्यंकटेश महाजन नावाने महाविद्यालय उभारले. सुरुवातीला प्रकाश महाजन यांनी या जमिनीतील हिस्सा मागितला होता. पुढे हा वाद अनेक वर्षे कायम होता. कालांतराने प्रवीण महाजन यांच्या मृत्यूनंतर सारंगी महाजन यांनी या हिश्श्यात मागणी केली आहे.

गेल्या सात वर्षांपासून ही केस सुरू असल्याचे सारंगी यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. काल उस्मानाबादेत आल्यानंतर सारंगी यांनी खासदार पूनम महाजन यांच्या ‘पीए’च्या गुंडांमार्फत धमक्या येत असल्याचा आरोप केला. महाजन कुटुंबीय जमिनीत वाटा देण्यास तयार नसले, तरी माझा हक्क मी मिळवणारच, असेही त्या ठामपणे सांगत आहेत. दरम्यान, कारागृहात बीपी तसेच डायबेटिसच्या गोळ्या बंद केल्यानेच पॅरोलवर असताना प्रवीण यांचा मृत्यू झाल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. गोळ्या बंद करणारे आज हयात नसल्याने त्यांचे नाव घेऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.