Tue, Nov 13, 2018 01:34होमपेज › Marathwada › अनाथ कन्यांचे उभारले संसार

अनाथ कन्यांचे उभारले संसार

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 08 2018 10:33PMपूर्णा : प्रतिनिधी

वाल्मीक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाऊ बनून 4 अनाथ बहिणींच्या विवाहाची जवाबदारी हाती घेतली. यात तीन बहिणींचा विवाह यापूर्वीच पार पडल्यानंतर 6 जुलै रोजी चौथ्या बहिणीचाही विवाह थाटामाटात पार पाडला. शहरातील कोळीवाडा परिसरात अत्यंत गरिबीतील भिसे कुटुंब आहे. यातील कुटुंबप्रमुख असलेेले कै.साहेबराव अनंतराव भिसे व त्यांच्या पत्नी कै.कमलाबाई भिसे रोज मजुरी करून स्वतःसह कुटुंबातील 4 मुली व 1 मुलगा यांचा उदरनिर्वाह करत होते. यातच अचानक 2006 मध्ये कमलाबाई यांचा जळून मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा अवघ्या दीड महिन्याचा मुलगाही भाजल्याने त्याचाही मृत्यू ओढावला. सदरील घटनेला अवघे 6 महिने उलटत नाही की पुन्हा भिसे कुटुंबावर काळाने झडप घातली.

कुटुंबातील एकमेव आधार असलेले साहेबराव यांचेही अकाली निधन झाल्याने भिसे कुटुंबातील 4 मुलींवर अनाथ होण्याची  परिस्थिती ओढावली. पण म्हणतात ना अनाथांचा नाथ वाली असतो दैवाने साथ दिल्याप्रमाणे भिसे कुटुंबातील या अनाथ बहिणींना मनापासून आधार दिला तो वाल्मीक मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी. यातील असंख्य भावांनी भिसे कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी धाराबाई हिचा विवाह 2008 मध्ये वसमत तालुक्यातील मालेगाव येथील मारुती क्षीरसागरशी, द्वितीय मुलगी ज्योतीचा विवाह 2010 मध्ये औंढा तालुक्यातील मुर्तूजापूर सावंगी येथील बालाजी मोरेशी, तृतीय मुलीचा विवाह 2014 मध्ये नांदेड येथील वसरणीतील संतोष दारकोंडे याच्याशी पार पाडला. एवढ्यावरच ते न थांबता  भसे कुटुंंबातील चौथी मुलगी उज्ज्वला हिचा विवाह वसरणी नांदेड येथील गजानन दारकोंडे यांच्याशी जुळवून दि.6 जुलै रोजी कोळीवाडा परिसरात अत्यंत थाटामाटात तो विवाह पार पाडला.