होमपेज › Marathwada › कारवाई करण्यासाठी दम लागतोः धनंजय मुंडे 

कारवाई करण्यासाठी दम लागतोः धनंजय मुंडे 

Published On: Jan 08 2018 3:49PM | Last Updated: Jan 08 2018 3:52PM

बुकमार्क करा
नांदेड : प्रतिनिधी

सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त कारवाईची भाषा करत आहेत. मात्र कारवाई करण्यासाठी दम लागतो, तो त्यांच्यात नाही. त्यामुळे दाखवितो, बघतो असे म्हणणार्‍या मुख्यमंत्र्यामध्ये अजिबात दम नसल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाडयातून होणार आहे. नांदेड जिल्हयात लोहा, उमरी व माहूर अशा 3 ठिकाणी सभा होणार आहेत. या निमित्ताने पक्ष पदाधिकार्‍यांची आढावा बैठक धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की पहिल्या टप्यात हिवाळी अधिवेशनाच्या तोडांवर विदर्भातून हल्लाबोल आंदोलनास सुरुवात केली. शेतकर्‍यांच्या विविध मागण्या घेऊन रस्त्यावर उतरलो. त्यामुळे सरकारला काही निर्णय घेणे भाग पडले. मात्र बऱ्याच विषयात सरकारने फक्त घोषणा केल्या, परंतू अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे या वेळी आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत.

मराठवाडयातील समस्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणार आहोत. या हल्लाबोल यात्रेची सुरुवात 16 जानेवारीपासून तुळजापूर येथून होत आहे. दहा दिवसांच्या या यात्रेत दहा दिवसामध्ये दररोज 3 या प्रमाणे 28 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडयाच्या आठही जिल्हयामध्ये दिवसाला तीन सभा घेतल्या जाणार आहेत. तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाने या हल्लाबोल यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. या हल्लाबोल यात्रेत 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 21 जानेवारीला नांदेड जिल्हयात लोहा, उमरी, व माहुर येथे सभा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.