Sun, Jul 12, 2020 21:50होमपेज › Marathwada › लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुनाला अटक

लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुनाला अटक

Published On: Jul 18 2019 8:42PM | Last Updated: Jul 18 2019 8:40PM
पाथरी : प्रतिनिधी

पाथरी तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील अव्वल कारकुनाला शेतकऱ्याकडून ६ हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय परभणी यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत गुरुवारी दुपारी पाथरी तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील अव्वल कारकुनाला सहा हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून ताब्यात घेतले. पाथरी तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्यावर उन्हाळ्यात आग लागून कडबा व गाईचे वासरू जळाले होते. यासंदर्भात शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून ज्ञानोबा सोनबा काळे याने तक्रारदार शेतकऱ्याकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी १८ जुलै रोजी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये लाचेच्या रकमेसह ज्ञानोबा काळे याला ताब्यात घेण्यात आले.