Sat, Jul 20, 2019 13:46होमपेज › Marathwada › वीज जोडणी नाही, शेतकर्‍यास २० हजारांचे बिल

वीज जोडणी नाही, शेतकर्‍यास २० हजारांचे बिल

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 1:14AMएरंडेश्‍वर : प्रतिनिधी

येथील एका शेतकर्‍याने शासनाच्या निकषाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करीत तीन वर्षांपूर्वी कृषीपंप वीज जोडणीसाठी कोटेशनचा भरणा केला, पण त्याच्या शेतात आजपर्यंत कुठलाही विजेचा खांब व तार उभा न करताच त्याला तब्बल 19 हजार 910 रुपयांचे वीजबिल दिल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. याबाबत शेतकर्‍याने अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर केले आहे. 

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्‍वर येथील शेतकरी नारायण मुंजाजी काळे यांची गट क्रमांक 248 मध्ये शेतजमीन आहे. या शेतात त्यांनी कृषीपंपाकरिता वीज जोडणी घेण्यासाठी 2014 मध्ये महावितरण कंपनीकडे रीतसर कागदपत्रे देऊन कोटेशनचा भरणा केला. पण यास तब्बल तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटला तरी या शेतकर्‍याच्या शेतात महावितरणने कुठलाही विजेचा खांब अथवा तारांची जोडणी केली नाही. यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच वीजजोडणी केली नसली तरी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्या शेतकर्‍यास तब्बल 19 हजार 910 रुपयांचे वीजबिल दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यात 545030010953 हा ग्राहक क्रमांक शेतकर्‍यास दिला आहे.  हे बिल मिळाल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला. यामुळे विजेची जोडणी नसताना हे बिल कसे काय दिले? याची शहानिशा करण्यात यावी व संबंधित बिल देणारांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी नारायण काळे यांनी अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.