Thu, Nov 22, 2018 16:08होमपेज › Marathwada › कुलूप ठोकल्याने शाळेला मिळाले मुख्याध्यापक

कुलूप ठोकल्याने शाळेला मिळाले मुख्याध्यापक

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:49PMपरळी : प्रतिनिधी

तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळेला मुख्याध्यापकच नाही. यामुळे संतप्त गावकर्‍यांनी शाळेला  कुलूप ठोकले. मुख्याध्यापकांच्या नेमणुकीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन शाळेबाहेर केले. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहताच गटशिक्षणाधिकार्‍यांनी अखेर त्वरित मुख्याध्यापकांची नेमणूक केली.    

गाढे पिंपळगाव येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आहे. पहिली ते सहावी असे वर्ग या शाळेत आहेत, पण या शाळेत मुख्याध्यापकच नसल्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. यापूर्वीच्या मुख्याध्यापकांचे कामही समाधानकारक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेला इ-लर्निंग, नवीन शौचालय व इतर मोठ्या प्रमाणावर निधी आला होता, त्यात बोगस कामे करून मोठा अपहार केल्याचा आरोप माजी सरपंच शरद राडकर यांनी केला आहे.

यासंदर्भात एक महिन्यापूर्वी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, पण त्यांनी दखल घेतली नाही, असे राडकर यांनी सांगितले. म्हणून  पालक, गावकर्‍यांनी शाळेत येऊन शाळेला कुलूप लावले व जोपर्यंत गटशिक्षणाधिकारी शाळेत येणार नाहीत तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा पवित्रा घेतला. यानंतर गटशिक्षणाधिकारी खरात हे स्वतः शाळेत आले व तत्काळ प्रभारी मुख्याध्यापकांची नेमणूक केली. यानंतर गावकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले.