शिरूर : जालिंदर नन्नवरे
‘अवो शंकराच्या नावानी,
अवो पांडुरंगाच्या नावानी...
सकाळच्या रामपार्यामंदी,
वासुदेवाचे लेकरू आलं...’
धर्म पावला, दान पावलं असं म्हणत बासरी आणि टाळ वाजवत भल्या पहाटे नाचत येणारा वासुदेव आता दिसेनासा झाला आहे. ‘दात्याला दान पावलं’ म्हणणारी वासुदेवाची गाणी अधुनिक युगात अखेरच्या घटका मोजत आहेत. यामुळे या नव्या पिढीला वासुदेवाचा विसरच पडला आहे.
जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी पहाट मोठी देखणी असायची. घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणार्या महिला, गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी गडीमाणसं अन् त्याच वेळी डोक्यावर मोरपिसांची उभट टोपी घातलेला, अंगात विशिष्ट प्रकारचा झगा, पायात घुंगरू, हातात टाळ आणि बासरी घेऊन गाणं म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा.
वासुदेवाची गाणी ऐकण्यासारखी असत. ‘चांगुणाच्या घरी शंकर आले भोजनाला’, ‘सत्त्वशील माउली टाळूनी वचनाला’, ‘स्वस्थ बसा स्वामी मन करूनी धीर..’ अशा गाण्यांमधून देवादिकांच्या कथा सांगितल्या जात. ‘पंढरीच्या विठोबाला, कोंढणपुरात तुकाबाईला, सासवडमंदी सोपानदेवाला, जेजुरीमंदी खंडोबाला, आळ्या बेल्यात ग्यानबाला, भीमाशंकरी महादेवाला, मुंगी पैठणात नाथमहाराजाला...’, अशा गाण्यांतून देवादिकांचे नामस्मरण होई. ‘तुळस वंदावी वंदावी, मावली संतांची सावली’, ‘तुळसी ऐसे लावता रोप, पळूनी जाती सगळे दोष,’ अशी आरोग्यदायी तुळसीची महती सांगितली जाई. रामहरी भगवान, भजावे मुखी राम, खोटी वासना सोडूनी द्या, पन देवाचे चरण धरा, आई बाप घरची काशी मानुनी त्यांचे चरण धरा...’, असे मानवी जीवनाला आवश्यक अशा उत्तम प्रकारच्या सद्विचारांचीही महती सांगितली जाई. आता या वासुदेवांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. वासुदेवाचं रूप घेऊन दान पावलं म्हणत दान मागणारी परंपरा काळाच्या ओघात लुप्त होऊ पाहत आहे.