Wed, Jul 15, 2020 13:11होमपेज › Marathwada › परळीत नायब तहसीलदारांना मारहाण

परळीत नायब तहसीलदारांना मारहाण

Last Updated: May 29 2020 4:10PM
शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा दाखल

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा 

येथील तहसील कार्यालयात फेरफार नकल देण्यावरुन नायब तहसीलदार बाबुराव रुपनर व एका लिपिकाला मारहाण करण्यात आली. ही घटना दि. २८ रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. लिपिक सुरज शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी यांनी आज काळ्या फिती लावून काम केले. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना बीड यांनी केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तो रोखण्यासाठी पोलिस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, तहसील प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आहे. असे असताना परळी शहरात मात्र अधिकारी वर्गाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.२८) दुपारी चारच्या सुमारास येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालनासमोर तीन युवक गोंधळ घालत होते. नायब तहसीलदार बाबुराव रुपनर आपल्या दालनातून बाहेर आले. त्यांनी या युवकांना विचारले असता आमच्या आताच्या आता आमच्या फेरफारची नक्कल पाहिजे आहे आणि तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? असे म्हणत या युवकांनी रुपनर यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. 

रुपनर हे दिव्यांग आहेत. तहसीलमधील कर्मचारी व इतर नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण मियवले. शहराच्या इतिहासात तहसील कार्यालयात एकाद्या अधिकाऱ्याला मारहाण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात फोन केल्याने पोलिसांनी तत्काळ तहसीलमध्ये येऊन तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी लिपिक सुरज शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपी सुनील गित्ते, सुरेश डापकर व शाम मुंडे यांच्या विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळयाचा गुन्हा कलम ३५३, ३३२, ५०४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत असून अधिक तपास सपोनि एस. जे. भारती हे करीत आहेत.