होमपेज › Marathwada › पंतप्रधान साधणार आज 15 लाभार्थींशी संवाद

पंतप्रधान साधणार आज 15 लाभार्थींशी संवाद

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:45PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात पंतप्रधान घरकूल आवास योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या आणि सध्या त्या घरात वास्तव्य करत असलेल्या निवडक 15 लाभार्थींशी 5 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. 

यासाठी निवडलेल्या देशातील एकूण चार विभागांत महाराष्ट्राचा समावेश असून त्यातही एकच जिल्हा निवडला गेला असून परभणीत योजनेचे काम उत्कृष्ट झाल्याने या जिल्ह्याची निवड केली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.  सदरील कॉन्फरन्सिंग चालू असताना निवडक लाभार्थींसह मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज,  प्रकल्प संचालक प्रताप सवडे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये थांबणार आहेत. कॉन्फरन्स कालावधीत जिल्ह्याचा माईक बंद राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत आदेशित केल्यानंतरच त्यावेळेपुरता हा माईक सुरू ठेवावा अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या कॉन्फरन्सिंगसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. जे लाभार्थी स्वतःचा अनुभव पंतप्रधानांसमवेत थेट मांडू शकतील, अशा 15 लाभार्थींची अंतिम निवड केली आहे. यात 5 अल्पसंख्याक महिला, 5 अनुसूचित जाती जमाती, 4 इतर संवर्गाच्या लाभार्थींचा समावेश आहे.