Thu, Apr 18, 2019 16:34होमपेज › Marathwada › कार्यकारी अभियंत्यास तीन वर्षे कारावास

कार्यकारी अभियंत्यास तीन वर्षे कारावास

Published On: Jan 08 2018 6:06PM | Last Updated: Jan 08 2018 6:06PM

बुकमार्क करा
नांदेड : प्रतिनिधी

तेराव्या वित्त आयोगातून उमरी येथे केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करुन 3 हजार रुपये स्विकारले होते. या प्रकरणी विशेष न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यास 3 वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. 

शरद मंगा तायडे असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव असून, त्याने तेराव्या वित्त आयोगातून उमरी येथे केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाच्या संचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी 4 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन रितसर तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची दखल घेउन सापळा रचला. दरम्यान, संचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी 3 हजार रुपयांवर तडजोड झाली. दि.1 ऑक्टोबर 2014 रोजी दुपारी 2 च्या सुमारास जिल्हा परिषद इमारीतीच्या मागे वाहनतळावर शासकीय कारमध्ये बसून शरद तायडे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करुन लाच स्विकारली होती. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तायडे यास रंगेहात पकडले. वजिराबाद पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.

सोमवारी (दि. 8) विशेष न्यायालयाने शरद तायडे यास 3 वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी 4 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात शासनातर्फे शासकीय अभियोक्ता डी.जी. शिंदे यांनी युक्तिवाद केला तर तायडे याच्यावतीने एम.एम. हाटकर यांनी बाजू मांडली