Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Marathwada › नोकरीच्या आमिषाने तरूणाची फसवणूक 

नोकरीच्या आमिषाने तरूणाची फसवणूक 

Published On: Jul 22 2018 5:08PM | Last Updated: Jul 22 2018 5:08PMनागपूर : प्रतिनिधी 

इंडियन ऑईलमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावावर चंद्रपूर येथील तरुणाची वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरात 15 लाखाने फसवणूक करण्यात आली. शुक्रवारी पीडित तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविली. या प्रकरणी दिल्ली येथील विजय मल्होत्रा व विनोद, हिंगणघाट येथील ज्ञानेश्‍वर दाडे, नागपूर येथील प्रतीक गोटे या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारकर्ता तरुण नगिनाबाग स्वावलंबीनगर, चंद्रपूर येथील रहिवासी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या या तरुणास चौघांनी हेरले व संगनमत करून इंडियन ऑईलमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. खोटे दस्त देऊन त्याच्याकडूनच 15 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना मे 2018 मध्ये घडली. आरोपींनी नोकरी न लावून देता त्याची फसवणूक केली. घडलेल्या प्रकाराने व्यथित तरुणाने संबंधितांकडे पैसे परत मागितले.पण त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हिंगणघाट पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदविण्यात आली. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.