Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Marathwada › मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसोबत घेतले भोजन

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसोबत घेतले भोजन

Published On: Jul 14 2018 7:42PM | Last Updated: Jul 14 2018 7:44PMनागपूर : प्रतिनिधी 

कोणत्याही आपत्‍कालीन परिस्थितीत देशाची, राज्याची, शहराची सुरक्षा व्यवस्था सांभाळणार कोण? असा जेव्हा पहिला प्रश्‍न उपस्थित होतो. तेव्हा, आपसुकच स्मरण होते, पोलिसांचे! मात्र, अशा बिकट परिस्थितीत ते कसे राहतात, झोपतात, जेवतात! याची साधी तसदी कुणीच घेताना आढळत नाहीत. पावसाळी अधिवेशनासाठी राज्यातील 15 जिल्ह्यांतून 4800 पोलीस कर्मचारी शहराची व्यवस्था सांभाळत आहेत. अशा पोलिसांच्या शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत त्‍यांच्यासोबत भोजन करून सर्वाना आश्चर्याचा धक्‍का दिला.

या पोलिसांसाठी आरपीटीएस येथे त्यांचे शिबिर वसविण्यात आले आहे. पोलिसांचा हालहवाला जाणून घेण्यासाठी त्‍यांची चौकशी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराला अचानक भेट दिली, तेव्हा सगळेच पोलीस कर्मचारी अवाक झाले. एवढेच नव्हे तर, ’व्हीआयपी कल्चर’ सोडून मुख्यमंत्री महोदयांनी पोलिसांसोबत जेवणाची थाळी घेतली आणि अन्न घेण्यासाठी रांगेतही लागले. हे सगळे आपल्याच डोळ्यासमोर घडतेय का? असा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात डोकावत होता. 

नागपुरात 1971 नंतर प्रथमच पावसाळी अधिवेशन होत आहे. 4 जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनासाठी राज्यभरातून पोलीस कर्मचार्‍यांची अतिरिेक्‍त कुमक मागविण्यात आली आहे. या सगळ्या कर्मचार्‍यांचा कॅम्प आरपीटीएस येथे वसविण्यात आला आहे. तब्बल महिनाभर राहायचे, तर त्याचे नियोजनही तसेच असते. त्यात कधी त्रुटी राहून जातात, तर कधी अव्यवस्थेमुळे अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. मात्र, अशाही स्थितीत आपल्या कर्तव्यात जराही कसूर न ठेवता, आलेल्या सगळ्या परिस्थितीशी दोन हात करण्याचे कसब या पोलीस कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणाचाच एक भाग असतो. मात्र, तरीही राज्याला एक जबाबदार आणि राज्याचा एक प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभराचे अधिवेशनाचे कामकाज आटोपून शुक्रवारी या शिबिराला भेट दिली. नुसती
भेट दिली एवढेच नव्हे. तर, पोलिसांशी चर्चाही केली आणि त्यांचे हालहवाल जाणूनही घेतले. ज्यांच्यासाठी सुरक्षेचा आटापिटा करावा आणि ते सरळ निघून जावे, असे राज्याचे अत्यंत महत्त्वाची व्यक्‍ती थेट आपली विचारपूस करतात, हे बघून कुणालाही कुतूहलच वाटावे, असा हा क्षण होता. यावेळी, योगेश ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. तर एपीआय वाल्मिक  रोकडे यांनी पोलिसांच्या वतीने त्यांचे आभारही मानले. सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर मुख्यमंत्री थेट जेवणाच्या टेबलाजवळ गेले आणि इतर कर्मचार्‍यांसोबतच त्यांनी जेवणाची थाळी स्वत:च्या हाताने घेतली, स्वत:च ती थाळी भरली आणि गप्पागोष्टी करताना आनंदाने जेवणाचा आस्वादही घेतला. खास मुख्यमंत्र्यांसोबत जेवणाचा हा सोहळा सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी आनंदाने अनुभवला. नव्हे, तर, आयुष्यभर साठवून ठेवण्याचाच हा एक
समाधानाचा अत्यंत दुर्मिळ क्षण पोलिसांसाठी ठरला.