होमपेज › Marathwada › नागापूरचे वाण धरण पडले कोरडे; परळीत पाणीबाणी

नागापूरचे वाण धरण पडले कोरडे; परळीत पाणीबाणी

Published On: Jun 13 2019 4:35PM | Last Updated: Jun 13 2019 4:35PM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

परळी तालुक्यातील मुख्य जलस्त्रोत असलेल्या व परळी शहरासह तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारे नागापूर येथील वाण धरण आता कोरडेठाक पडले आहे. परळी शहराला नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा आता बंद करण्यात आला आहे. पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. पाऊस पडल्याशिवाय शहराला पाणीपुरवठा शक्य नाही.      

तालुक्यातील  नागापूर येथील  'वाण प्रकल्पाची  क्षमता १९.७१ द.ल.घ.मी.एवढी आहे. आता या प्रकल्पात टक्काभरही पाणी शिल्लक राहिलेले नाही. परळीकरांसाठी काळ खडतर आहे. शहरात पाणीकपात नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली होती. आता वाण प्रकल्प कोरडा पडल्याने शहरासाठी पाणी पुरवठा टँकरने होणार आहे.

परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱा वाण प्रकल्प कोरडा पडल्याने आजपासून शासकीय योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मोठा पाऊस पडेपर्यंत आता वाण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जाऊ शकणार नाही. शहराला आता टँकरने पाणी पुरवले जाणार असून त्याचा सुयोग्य वापर नागरिकांनी करावा असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.