Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Marathwada › नाफेडकडून शेतकर्‍यांच्या पैशाला कात्री

नाफेडकडून शेतकर्‍यांच्या पैशाला कात्री

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:28AMहिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली तालुका खरेदी-विक्री संघाने खरेदी केलेल्या सोयाबीनच्या पैशाला नाफेडने कात्री लावली आहे. निकष डावलून खरेदी-विक्री संघाने शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी केले असले तरी नाफेडकडून मात्र पैसेवारी नुसारच मालाची खरेदी दाखवून त्या मालाचे हमीभावानुसार पैसे वाटप केले जात आहे. ज्या शेतकर्‍यांनी अतिरिक्‍त सोयाबीनची विक्री केली त्या शेतकर्‍यांना मात्र हक्‍काचे पैसे दिले जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हिंगोली तालुका खरेदी विक्री संघाचा कारभार मागील आठ महिन्यांपासून वादग्रस्त राहिला आहे. सुरुवातीच्या काळात नाफेडची नोडल एजन्सी म्हणून हिंगोली तालुका खरेदी विक्री संघाने तुरीची खरेदी केली होती. या खरेदीमध्ये संघाचे अध्यक्ष गोविंद भवर, व्यवस्थापक पवार यांनी मनमानी कारभार करून शेतकर्‍यांची लूट केली होती. तसेच व्यापार्‍यांच्या तुरीची शेतकर्‍यांच्या नावावर खरेदी केल्याचा आरोपही होत होता. तूर खरेदीतील गोंधळ संपल्यानंतर पुन्हा मूग व उडदाच्या खरेदीतही तालुका खरेदी-विक्री संघाने व्यापार्‍यांचा माल खरेदी केल्याचा आरोप करीत मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांनी आंदोलन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे उडीद, मूग खरेदीची चौकशी झाल्याने यामध्ये अतिरिक्‍त माल खरेदी झाल्याचे उघड झाले होते. तसेच निकष डावलून माल खरेदी केला गेल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घालून शेतकर्‍यांच्या याद्या जुळविण्याचे निर्देश दिले होते. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी अतिरिक्‍त मालाचा मुद्दा समोर करून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे हमीभावाने विक्री केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे धनादेश सोमवारपासून वाटप केले जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी 65 लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यातून हमीभावाने विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे दिले जात आहेत, परंतु यामध्ये अनेक शेतकर्‍यांच्या पैशाला कात्री लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील राजू देविदास घ्यार यांनी 9 नोव्हेंबर 2017 रोजी तालुका खरेदी विक्री संघाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर 20 क्‍विंटल सोयाबीनची विक्री केली होती. त्यांना केवळ 18 क्‍विंटल 90 किलो सोयाबीनचे 3050 या हमीभावानुसार 57 हजार 645 रुपयाचा धनादेश तालुका खरेदी-विक्री संघाकडून देण्यात येत असल्याने त्याने आपला 1 क्‍विंटल 10 किलो मालाचे पैसे कधी देणार असा प्रश्‍न उपस्थित करून धनादेश घेण्यास नकार दिल्याने तालुका खरेदी विक्री संघाची पंचाईत झाली आहे. 

तसेच साटंबा येथील भगवान दाजीबा घ्यार यांच्याकडे सात एकर शेती असून त्यांनी नाफेडकडे 50 क्‍विंटल सोयाबीनची विक्री केली आहे, परंतु पहिल्या यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांनीही तालुका खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले. सोमवारपासून सोयाबीन उत्पादकांचे धनादेश वाटप केले जात असले तरी त्यामध्ये शेतकर्‍यांचे पैसे कापून धनादेश दिले जात असल्याने शेतकर्‍यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.