Mon, Jun 17, 2019 02:48होमपेज › Marathwada › विवाहितेचा खून करून केला फाशीचा बनाव

विवाहितेचा खून करून केला फाशीचा बनाव

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMबीड : प्रतिनिधी 

तालुक्यातील पिंपळवाडी येथे विवाहित तरुणीने फाशी घेतल्याचे आढळून आले. सदरील विवाहितेचा सासरच्या मंडळींनी खून करून नंतर तिचा मृतदेह फासावर लटकविल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे, दरम्यान यानंतर सासरच्या मंडळींनी धूम ठोकल्याने माहेरच्या नातेवाइकांचा संशय अधिकच बळावला आहे.

पिंपळवाडी येथे स्वाती दीपक निकाळजे (वय 22) या विवाहितेचा मृतदेह घरातील आडुला गळफास घेतल्याच्या अवस्थेत शनिवारी आढळून आले. सदरील विवाहितेस सासरची मंडळी मानसिक व शारीरिक त्रास देत होती. यास कंटाळूस स्वाती ही गेल्या काही दिवसांपासून माहेरी इरला (ता. माजलगाव) येथे आई-वडिलांकडे रहात होती, मात्र स्वातीच्या मुलाचा पहिला वाढदिवस गावाकडे साजरा करू, असे म्हणत आठ दिवसांपूर्वी पती तिला सासरी घेऊन गेला. शनिवारी स्वातीचा मृतदेह आढळून आला. मृतावस्थेतील स्वातीचे पाय जमिनीला ठेकलेले दिसून आले, तसेच या घटनेनंतर सासरच्या मंडळी पसार झाली होती. त्यामुळे स्वातीने फाशी घेतली नसून तिचा सासरच्या मंडळींनी खून केला व नंतर तिचा मृतदेह लटकविला, असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे, दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  मृतदेहावर रविवारी सकाळी बीड येथील शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर पिंपळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत स्वातीच्या माहेरची मंडळी गुन्हा दाखल करण्यासाठी नेकनूर ठाण्यात होती.