Sun, May 26, 2019 08:39होमपेज › Marathwada › नगरपालिकेने उद्यानाचा केला उकीरडा

नगरपालिकेने उद्यानाचा केला उकीरडा

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:23PMबीड : प्रतिनिधी

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून नगर पालिकेच्या वतीने शहरात उद्याने उभारण्यात आली आहेत. ही उद्याने फार मोठी नसली तरी ‘हेही नसे थोडके’ म्हणून नागरिक आहे त्यात समाधान मानतात. यातीलच एक धर्मराज जोशी उद्यानात नगरपालिकेने गांडुळ खत प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पासाठी शहरातील कचरा येथे आणून त्याचे वर्गीकरण केले जात आहे. यामुळे उद्यानालाच उकांड्याचे रुप आले आहे. गत दोन दिवसाच्या रिमझीम पावसामुळे हा कचरा भिजला असून त्याचा उग्र दर्प परिसरात येत आहे. यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दिवसेंदिवस विस्तार होत असलेल्या बीड शहरात उद्याने म्हणता येतील अशी दोनचारच ठिकाणे आहेत. त्यातही सुविधांचा अभाव आणि कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष यामुळे तेथे बकालपणा येऊ लागला आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ धर्मराज जोशी उद्यान आहे. या उद्यानात नगरपालिकेच्या वतीने आसन व्यवस्था, बालकांसाठी विविध खेळण्यांची सोय करण्यात आली होती. परंतु कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बहुतांश खेळण्यांचे अवशेष आता उरले आहेत. यातच भर म्हणून काही महिन्यांपूर्वी या उद्यानात गांडुळ खत प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. गांडुळ खत प्रकल्पाची दुर्गंधी येत नाही, त्याचा आरोग्याला धोका नाही असे येथील कर्मचार्‍यांचे म्हणणे. परंतु या प्रकल्पासाठी शहरभरातून आणल्या जाणारा कचर्‍याचे काय? असा प्रश्‍न या निमित्ताने उभा राहतो. गत दोन दिवसात झालेल्या रिमझीम पावसामुळे हा कचरा भिजला असून त्याचा दर्प परिसरात येत आहे.  आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी येणार्‍या अबालवृद्धांना याचा त्रास होत असून बालकांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. या प्रकल्पासाठी इतरत्र जागा उपलब्ध करुन उद्यानाचा विकास करावा अशी मागणी होत आहे.