Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Marathwada › गोदावरीच्या पात्रातील खड्ड्यात बुडून मायलेकराचा मृत्यू

गोदावरीच्या पात्रातील खड्ड्यात बुडून मायलेकराचा मृत्यू

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 10:04PMपाथरी/लिंबा : प्रतिनिधी 

गोदावरी नदीपात्रातील खड्ड्यात पाय घसरून पडलेल्या मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आई व मुलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री गावाजवळ मंगळवारी (दि. 5) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये मात्र 9 वर्षीय अर्पिताला वाचवण्यात यश आले आहे. 

शोभा सर्जेराव रुमाले (वय 27) व  गोटू ऊर्फ अरविन रुमाले (6 वर्षे) असे मृत मायलेकरांची नावे आहेत. डाकूपिंपरी येथील शोभा रुमाले या सकाळी आपल्या मुलगा व मुलीसह गोदापात्रात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. गोदापात्रात शेतकर्‍यांनी पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात त्यांचा मुलगा गोटू याचा पाय निसटला व तो खड्ड्यात पडला. ते पाहून आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता तीपण त्या खड्ड्यात बुडाली. हे पाहून अर्पिता आरडाओरड करू लागली, तेवढ्यात रामभाऊ सटवाजी महात्मे गावातून आपल्या शेताकडे जात असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तिकडे धाव घेतली, तोपर्यंत अर्पिताने आई व भावाला वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली होती. रामभाऊ महात्मे यांनी अर्पिताला  तत्काळ पाण्याबाहेर काढल्याने ती बचावली; पण त्यात शोभा व गोटू ऊर्फ अरविन या दोघांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पोलिस पाटील उद्धव सोनवणे यांनी पाथरी पोलिसांत घटनेची माहिती दिली. घटनेचा पंचनामा करण्याचे काम मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.