आर्वी : जालिंदर नन्नवरे
वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सध्या पेट्रोल टाकल्यानंतर वाहनांच्या टाक्यांमध्ये पाणी निघत आहे. झटके देत गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे पेट्रोलमध्ये नक्की इथेनॉल मिक्स केले जाते की भेसळ होते, याबाबत वाहनधारकात संभ्रमाचे वातावरण आहे.
1 सप्टेंबर 2010 पासून पेट्रोलमध्ये 5 टक्के इथेनॉल मिक्स करण्यास सरकारने परवानगी दिली होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करून ते 10 टक्के करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून 10 टक्के इथेनॉल मिक्स केलेले पेट्रोल विकले जात आहे. मात्र, अलिकडच्या सहा महिन्यांपासून दुचाकींच्या टाक्यांमध्ये पाणी निघू लागले आहे, तसेच काही प्रसंगात गाड्या अचानक बंद पडत आहेत. गाडी बंद पडल्यानंतरही गाडीत पेट्रोल असल्याचे दिसते. एकतर गाडी सुरू होत नाही आणि सुरू झाली तरी काही वेळाने पुन्हा बंद पडते. ही बंद पडलेली गाडी गॅरेजचालकाला दाखविण्याची वेळ वारंवार येत आहे. टाकीचा कॉक उघडला तर टाकीतून पाण्याची धार बाहेर पडते. पूर्ण टाकी रिकामी केल्यानंतर त्यात पुन्हा पेट्रोल टाकले की गाडी सुरू होते. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात चारचाकी वाहनचालकांना तर गाडी टोईंग करूनच दुरुस्तीलो न्यावी लागते.
इंजिन बिघाडाचा आणि अपघाताचा धोका
इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनात भरले जात आहे. त्यामुळे वाहने अचानक गुडगूड करून बंद पडत आहेत. महामार्गावर भरधाव वेगाने वाहन असताना अचानक जर ते बंद पडले तर अपघाताचा धोका संभवतो. त्याशिवाय कार्बोरेटर आणि इंजिन खराब होण्याचा धोकाही आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिश्रित केले जाते की अन्य काही याबाबत संशय बळावला आहे.